सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
“आपले किल्ले आपली जबाबदारी’ या सातारा पोलिसांच्या मोहिमेअंतर्गत रविवारी किल्ले संतोषगडाची भ्रमंती व स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांसह पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी उपस्थिती लावली.
या मोहिमेमध्ये उपविभागातील फलटण शहर, फलटण ग्रामीण, शिरवळ, लोणंद व खंडाळा या पोलिस ठाणेकडील पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार यांनी सहभाग घेतला होता. याशिवाय सातारा जिल्हयातील नागरिक देखील मोहिमेमध्ये सहभागी झालेले होते. या मोहिमेदरम्यान किल्ले संतोषगड पायथा येथे एकत्रित येवून चढाई (ट्रेक) करण्यात आली. तसेच समूह तयार करुन किल्ले संतोषगड येथे महालक्ष्मी मंदीर व शिवकालीन बारव (विहीर) तसेच इतर ठिकाणी नियोजनबध्द स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
पोलिसांच्यावतीने राबविण्यात आलेल्या मोहिमेंतर्गत जैविक व अजैविक असा 55 किलो कचरा गोळा करण्यात आला. त्यानंतर संत गाडगे महाराज निवासी आश्रमशाळा, ताथवडा येथे एकत्र फलटण जमून स्थानिक नागरिक मोहन जाधव यांनी संतोषगडाबद्दल माहिती दिली. यावेळी एकूण 20 पोलिस अधिकारी, 112 पोलीस अंमलदार व 769 नागरिक, पत्रकार, व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सातारा पोलीस दलामार्फत प्रत्येक रविवारी सातारा जिल्हयातील एक किल्ला निवडून सदरची मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेत नागरिक, व्यापारी व तरुणांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही सातारा जिल्हा पोलिस दलाच्यावतीने करण्यात आले आहे.