सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे कोरोनाबाधित रुग्णांचा निकट सहवासित असलेल्या १७ वर्षीय युवकास कोरोनाची लागण झाल्याचे समजत आहे. आज सदर तरुणाचा रिपोर्ट निगेटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोनाच्या तीन नवीन रुग्णांची भर पडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सदर रुग्णांला या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. आता काल त्याच्या घशातील स्त्रावाचा नमुना पुर्नतपासणीसाठी बी.जे. वैद्यकीय महविद्यालय पुणे येथे पाठविण्यात आला होता. या तपासणीत या युवकाचा अहवाल कोरोना (कोव्हीड19) बाधित असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
तसेच मागच्या महिन्यात नागपूर वरून प्रवास करून आलेल्या 35 वर्षीय तरुणाला कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे घसा दुखत असल्यामुळे आणि तापेमुळे दाखल केले होते त्याचा आज अहवाल आला असून तो कोरोना बाधित निघाला आहे तर उपजिल्हा रुग्णालय कराड येथे 30 वर्षीय पुरुष जो गेल्या महिन्यात पुण्यावरून आला होता, त्याला ताप आणि घसा दुखत असल्यामुळे भरती केले होते त्याचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, असे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांनी कळविले असून हे दोन रुग्ण कोरोनाबाधित असल्याची माहिती गडीकर यांनी दिली आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता १४ वर गेली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये तसेच आरोग्याची खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. कोणालाही घशात दुखत असेल किंवा ताप आला असेल तर त्यांनी तात्काळ आपली वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.