सातारा : राज्यात कोरोनाचा नवा विषाणू ओमीक्रॉन याचे रुग्ण ठिकठिकाणी आढळून आले आहे. दरम्यान आज सातारा जिल्ह्यातील फलटण शहरामध्ये आफ्रिकेतील युगांडा येथून आलेले एकाच कुटुंबातील चौघे जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. या चौघांपैकी तिघांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यामुळे शहरामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने तत्काळ खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, फलटण शहरातील एकाच कुटूंबातील ओमिक्रोन बाधित चौघा जणांमध्ये पती, पत्नी आणि दोन लहान मुले याचा समावेश आहे. ते रविवारी परदेशातून फलटण मध्ये आले होते. याची माहिती प्रशासनाला समजताच प्रशासनातील अधिकाऱ्यांनी त्यांची तत्काळ कोरोना टेस्टही केली होती. त्याचा रिपोर्ट तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. कोरोना रिपोर्ट पोझिटिव्ह आल्यानंतर ओमिक्रोनची चाचणीही करण्यात आली. आज त्यांच्यापैकी तिन जणांचा अहवाल ओमिक्रोन बाधित आला आहे.
संबंधित कुटूंबीय हे दि. 9 डिसेंबर रोजी आफ्रिकेतील युगांडा वरून मुंबईला आले होते. त्यावेळी विमानतळावर उतरल्यावर त्यांची कोरोना टेस्ट केली असता त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. तरीसुद्धा त्यांना होम आयसोलेशनचा सल्ला देण्यात आला. यानंतर काल ते फलटणला येऊन होम आयसोलेट झाले होते. प्रशासनाला याची माहिती मिळताच त्यांनी त्यांचे स्वॅब घेतले असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना केल्या. आता संबंधितांना ओमिक्रोनची बाधा झाल्याचे आज स्पष्ट झाल्याने प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.