सातारा । खासदार उदयनराजे भोसले यांनी एका भावनिक पोस्टच्या माध्यमातून एका खास व्यक्तीच्या निधनाचं दु:ख व्यक्त केलं आहे. तिचं जाणं हे फक्त सातारकरांसाठी नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठीच अत्यंत वाईट बातमी आहे अशा शब्दांत त्यांनी या पोस्टची सुरुवात केली. “प्लमोनरी हायपरटेन्शन” या आजाराचं निदान झाल्यानंतर त्याच्या झुंज देणाऱ्या कोमल पवार गोडसे हिचा संघर्ष त्यांनी आपल्या या पोस्टच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. कोमल ही महाराष्ट्रातील दोन्ही फुफ्फुस आणि हृदय प्रत्यारोपण झालेली पहिली व्यक्ती. पण, काही दिवसांपूर्वीच तिचा आजार बळावला आणि गोष्टींनी नको तेच वळण घेतलं.
कोमल ही आपल्या लहान बहिणीप्रमाणे असल्याचं म्हणत उदयनराजे यांनी तिच्यासोबतचा एक फोटोही पोस्ट केला. या फोटोसह त्यांनी लिहिलं, ‘सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. सातारा शहराला अभिमान असलेला हसरा चेहरा कोमल पवार – गोडसे हीला २०१७ साली “प्लमोनरी हायपरटेन्शन” या व्याधीचे निदान झाले आणि तिचे आयुष्य जणू तिथेच स्तब्ध झाले, पण तिने व तिच्या पतीने धीर सोडला नाही आणि ती मृत्यूच्या दाढेतून बाहेर आली आणि कोमल ठरली होती महाराष्ट्रातील पहिली “दोन्ही फुफ्फुस आणि हृदय प्रत्यारोपण” झालेली व्यक्ती. पण ३ दिवसापूर्वी कोमलचा आजार अचानक वाढल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार यांनी तिला ताबडतोब हैदराबाद येथे शिफ्ट केले, परंतु आज पहाटे कोमल आपल्यात न राहिल्याची बातमी समजली आणि धक्का बसला.’
https://www.facebook.com/Chh.UdayanrajeBhonsleOfficial/posts/1844129225726245
कोण आहे कोमल पवार?
साताऱ्यातील कोमल पवार ही लग्नानंतर अवघ्या वर्षभरातच आजारी पडली. विविध ठिकाणी तिच्यावर उपचार करण्यात आले. पण, आजाराचं स्वरुप अधिकच गंभीर होत गेल्यामुळं तिला फुफ्फुसं आणि हृदय प्रत्यारोपण करण्याचा सल्ला देण्यात आला. साताऱ्यातील अनेकजण आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीच्या ओघानं कोमलवर उपचार झाले. तिनं मृत्यूवर बऱ्यात अंशी मात केली. अवयवदानामुळं हे साध्य होऊ शकवलं होतं. ज्यामुळं पुढे जाऊन पतीसह तिनं ‘कोमल न्यू लाईफ फाऊंडेशन’ ही संस्था सुरु करत गरजूंना मदतीचा हात पुढे केला होता. कोमल मात्र एक नवी सुरुवात करुन साऱ्यांचाच निरोप घेऊन गेली. तिला सर्व स्तरांतून श्रद्धांजली वाहत तिच्या कार्याला दाद देण्यात येत आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.