कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील हिंगनोळे येथे सुरू असलेल्या घरोघरी शाळा या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या घरातच तयार करण्यात आलेल्या स्वतंत्र शाळेचे उद्घाटन विद्यार्थी व पालक यांच्या हस्ते अनोख्या पद्धतीने उत्साहात पार पडले.
माण तालुक्यातील जि. प. प्राथ. शाळा वडगावचे मुख्याध्यापक संजय खरात यांची संकल्पना असलेल्या घरोघरी शाळा हा उपक्रम हिंगनोळे जि. प. शाळेच्या उपशिक्षिका अर्चना विनोद बाबर यांनी इयत्ता 2 री, 3 री व चाैथी मध्ये राबवण्यास सुरुवात केली आहे. शंभर टक्के विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रभावीपणे सुरू ठेवण्यासाठी त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी स्वतंत्र शाळा निर्माण करून प्रत्येक विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्याचा संच मोफत दिला आहे.
घरोघरी शाळा पैकी कु. वेदांतिका अमोल सरकाळे व आदित्य राहुल सरकाळे या विद्यार्थ्यांच्या घरी सदर उद्घाटन सोहळा पार पडला. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या घरासमोर फुग्यांची आकर्षक कमान केली होती. दारासमोर आकर्षक रांगोळी व विद्यार्थ्यांच्या घरांमध्ये विविध तक्ते लावण्याबरोबरच फुग्यांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. कोरोना संकटामुळे सुमारे दीड वर्ष शाळा बंद असल्याने शाळे पासून दूर असलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष घरातच शाळा अवतरल्यामुळे पालकांच्यात व विद्यार्थ्यांच्यात समाधानाचे व उत्साहाचे वातावरण होते. याबरोबरच संज्योती प्रवीण यादव, आकांक्षा सिद्धनाथ पाटील, आरोही महादेव इंगळे, सादिक अक्तर मुलाणी, पियुषा तानाजी लोंढे, अक्षरा सिद्धनाथ पाटील, प्राजक्ता सचिन कांबळे या विद्यार्थ्यांनी ही आपल्या घरात घरोघरी शाळा मोठ्या उत्साहात आज सुरू केल्या.
घरोघरी शाळा या विशेष उपक्रमासाठी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी शबनम मुजावर, विस्तार अधिकारी सन्मती देशमाने, उंब्रज केंद्राचे केंद्रप्रमुख हणमंत काटे, मुख्याध्यापिका मंदा जाधव, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुनिता शेंडगे, उपशिक्षिका मनिषा रामुगडे यांचे मार्गदर्शन लाभले.