कराड | सावरकर यांच्या विषयी राहुल गांधींना प्रश्न विचारला होता, त्यावरती त्यांनी पुरावे दिले होते. त्या मुद्द्याला भाजपवाल्यांनी डोक्यावर घेतले, आता त्यांनी उत्तर दिली पाहिजेत. सावरकर हे क्रांतीकारी होते अन् माफीवीरही होते. त्यांना ब्रिटिश मानधन का देत होते, ते ब्रिटिशांची काय सेवा करत होते. याबाबत इतिहासात शोधले पाहिजे, असे मत माजी मुख्यमंत्री व काॅंग्रेसचे जेष्ठ नेते आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. कराड येथे ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
काळ्यापाण्याची शिक्षा हजारो माणसांना झालेली होती. ती शिक्षा वाईट होती, पन्नास वर्षाची होती. काळ्या पाण्याची शिक्षा सावरकरांना झाली का? तर ती झाली होती. सावरकर क्रांतिवीर होते का? असं म्हटलं जातं, तर ते होते. ते चांगले लेखक, कवी होते. त्यांनी 1857 च्या युद्धाबद्दल एक भूमिका मांडली होती. त्या युद्धाविषयी त्यांनी लिहिताना शिपायांचे ते बंड नव्हते, तर स्वातंत्र्य युद्ध होते असे पुस्तक लिहिले. इंग्रजी सत्तेविरुद्ध पुस्तक लिहिल्यामुळे इंग्रज नाराज झाले होते. त्यांच्यावर खटला घातला जायला होता तेव्हा ते लंडनला गेले. लंडन मधून ते पॅरिसला पळून गेले होते. तिथे त्यांना पकडले आणि तेथून त्यांना भारतात आणताना त्यांनी जहाजातून समुद्रात उडी घेतली, या सर्व गोष्टी खऱ्या आहेत.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/542445407727601
त्यामुळे ते क्रांतिकारक होते. त्यांनी पुस्तकं लिहिली. या सर्वांशी आपण सहमत होऊ शकत नाही. त्यांना वयाच्या 28 व्या वर्षी काळ्यापाण्याची शिक्षा मिळाली. त्यांनी दहा वर्षाची शिक्षा भोगली. काळ्यापाण्याची शिक्षा कोणालाही कल्पना करता येणार नाही, अशी अत्यंत क्रूर शिक्षा असते. अजून 40 वर्षे आत बसण्यापेक्षा वयाच्या 38 व्या वर्षी त्यांनी निर्णय घेतला. त्यांनी एक पत्र लिहिले त्यामध्ये म्हटले, मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली. मी पुन्हा असे करणार नाही. मी तुम्हांला मदत करेन, ब्रिटीश राज्याला प्रामाणिक राहीन. अशा पध्दतीने एक पत्र लिहिले. सावरकरांची सर्व पत्र राष्ट्रीय संग्राहलयात उपलब्ध आहेत. ती पत्र फक्त राहूल गांधींनी दाखवली.
आम्ही काय म्हणतोय, सावकरकर माफीवीर होते. त्यांनी माफी मागितली, त्याचा पुरावा दिला. तेथेच विषय संपला होता. माझं वैयक्तिक मतं असे आहे, की ते क्रांतीकारी होते का तर होते. इंदिरा गांधींना त्याच्याबद्दल 1966 ला पोस्टेज स्टॅम्प काढला. सावरकर जर देशद्रोही माणूस असतील तर इंदिरा गांधींना इतिहास माहित नव्हता का? तसेच ज्यावेळी सावकरकरांचे निधन झाले, तेव्हा चांगले पत्र लिहिले होते. त्यामुळे ही एक भावना होती म्हणून दुसरी भावना नव्हती असे नाही. सावरकरांनी दहा वर्षे शिक्षा भोगल्यानंतर त्यांना ब्रिटीशांनी सोडले, मग ते रत्नागिरीला आले. त्यांना 60 रूपये मानधन दिले जात होते. तेव्हाचे म्हणजे 1920 सालचे 60 रूपये म्हणजे आजचे 50 ते 60 हजार रूपये होतात. ब्रिटिश त्यांना का मानधन देत होते, ते ब्रिटिशांची काय सेवा करत होते, हे इतिहासात शोधले पाहिजे.
त्यानंतरच्या काळात त्यांनी काही चांगल्या भूमिका ही घेतल्या, हिंदू धर्मात अनेक सुधारणा केल्या. त्यामध्ये त्यांनी गो माता पवित्र नाही, एक उपयोगी पशु आहे. स्वतः ब्राह्मण असून मासांहाराचा पुरस्कार केला. त्या दृष्टीने ते व्यवहारिक व एक चांगले पुरस्कर्ते होते. परंतु काही गोष्टी त्यांनी चांगल्या केल्या आणि वाईट केल्या. त्यांच्या लिखाणात अनेक गोष्टी विचित्र अशा आहेत. तेव्हा या व्यक्तीचे मूल्यमापन करताना ऐतिहासिक दृष्ट्या केले पाहिजे.