व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

बेळगाव, कारवार, निपाणी सोडत असाल तर..; पवारांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना ठणकावले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावांवर दावा केला आहे. त्यामुळे कर्नाटक- महाराष्ट्र सीमाप्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोम्मई याना थेट प्रत्युत्तर दिले आहे. तुम्ही बेळगाव, कारवार आणि निपाणी सोडत असाल तरच पुढची चर्चा होऊ शकते, असे पवार यांनी ठासून सांगितलं.

आज मुंबईत शरद पवार यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केलं. बेळगाव कारवार निपाणी भालकी बिदर महाराष्ट्रात समाविष्य करण्यासाठी गेली अनेक वर्ष लढा सुरु आहे. मी काल बोम्मईंचं जतबाबत विधान ऐकलं. जर तिकडचं सरकार बेळगाव कारवार निपाणी हा सगळा परिसर आपल्याला सोडायला तयार असतील तर त्यांना काय काय देता येईल, यावर चर्चा करणं शक्य होईल, असं म्हणत महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावर शरद पवारांनी भाष्य केलं आहे.

यावेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाचाही त्यांनी समाचार घेतला. अनेक गोष्टींवर वादग्रस्त विधाने करणं हे या राज्यपालांचं वैशिष्ट्ये आहे. आणि तसा त्यांचा लौकीक आहे असा टोला त्यांनी लगावला. राज्यपाल ही एक संस्थात्मक पद असलं तर विद्यमान राज्यपालांनी सर्व मर्यादांचं उल्लंघन केलं आहे. राज्यपालांच्या वक्तव्याबाबत आता राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी याची दखल घ्यायला हवी असेही शरद पवार यांनी म्हटले.