परभणी प्रतिनिधी। गजानन घुंबरे
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचे सामाजिक कार्य व स्त्री शिक्षण यासाठीचे योगदान सर्व महिला समोर ठेवत आपणही त्यांची प्रेरणा घेवुन सावित्रीची लेक होवू हि भावना रुजावी या उद्देशाने मागील आठ दिवसांपासुन सावित्री गाथेतील वरिल ओव्यांचे पाथरी तालूक्यातील दोन गावामध्ये पारायण करण्याचा वेगळा उपक्रम महिला राजसत्ता आंदोलनातील गावशाखेच्या महिलांनी राबवला. निमित्त होते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे. पाथरी तालुक्यातील रामपुरी व देवनांद्रा गावातील महीलांनी यात सहभाग घेतला होता. दिनांक ३ जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनापासुन शुक्रवार 9 जानेवारी पर्यंत हे पारायण करण्यात आले.
शेवटच्या दिवशी गावामध्येच सर्व महिलांना मार्गदर्शन व योजनांची माहीती मिळावी म्हणून गाव माहीती केंद्राची स्थापना करण्यात आली. ज्यामध्ये पंचायतराज, विविध शासकीय योजना, शासकीय अद्यादेश आणि कायदेविषयक माहिती याची माहिती दिली जाणार आहे. महिलांना आर्थिक व बौद्धीकदृष्ट्या सक्षम करण्याची प्रतिज्ञा करत सावित्री गाथा पारायणाचा समारोप करण्यात आला. यावेळी स्थानिक महिलांना, महिला राजसत्ता आंदोलनाच्या विभागीय समन्वयक नंदाताई गायकवाड यांनी मार्गदर्शन केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शैला नवघरे,महानंदा भदर्गे, प्रतिभा अंभोरे यांनी परिश्रम घेतले.