पुणे । राज्यातील पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्र परीक्षा रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मात्र तसा लेखी आदेश अद्याप न आल्याने पुणे विद्यापीठाने परीक्षा घेण्याची तयारी सुरू केली आहे. याबाबत माहिती देताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. एन. एस. उमराणी म्हणाले की, “८ मेच्या राज्य शासनाच्या आदेशामध्ये अंतिम वर्ष वगळता बाकी वर्षांची परीक्षा होणार नाही असं नमूद केलं होतं. यानंतर अजून कोणताही नवीन आदेश शासनाकडून आलेला नाही. त्यामुळे ८ मेचं सर्क्यूलर हेच विद्यापीठासाठी बंधनकारक आहे. या सर्क्यूलरमध्ये नमूद केल्याप्रमाणे अंतिम वर्षाची परीक्षा घेण्याची तयारी विद्यापीठाकडून सुरु आहे.”
फक्त अंतिम वर्षाची परीक्षा होणार असा शासनाने आदेश काढल्यानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात अंतिम वर्षाचीही परीक्षा होणार नाही असं सांगितलं होतं. यावर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आक्षेप घेतला. यानंतर अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्याच्या संदर्भात कोणताही अधिकृत जीआर शासनाकडून काढण्यात आलेला नाही, असं विद्यापीठाचं म्हणणं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अंतिम वर्षासाठी जवळपास 2 लाख 46 हजार विद्यार्थी प्रविष्ट आहेत. ही परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाला विविध कोर्सेसच्या एकूण दोन हजार प्रश्नपत्रिका सेट कराव्या लागणार आहेत. विद्यापीठाकडून पारंपरिक पद्धतीची लेखी परीक्षा घेतली जाईल. यामध्ये दीड तासाची 50 किंवा 40 गुणांची प्रश्नपत्रिका असेल.
दरम्यान, पदवी परीक्षा न घेता सरसरी गुणांच्या आधारे मूल्यांकन करण्याचे सरकारने जाहीर केले असले तरी अद्याप याबाबत कोणताही शासननिर्णय प्रसिद्ध न झाल्याने विद्यार्थ्यांमध्येही संभ्रम वाढू लागला आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठानेही परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. व्यावसासिकी अभ्यासक्रमांच्या परीक्षांबाबत परीक्षा घेण्याबाबतच्याही अद्याप स्पष्ट सूचना नाहीत. अंतिम सत्रांच्या परीक्षा मात्र रद्द करण्यात येत असल्याची घोषणा स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तरीही तसा लेखी आदेश अद्याप न आल्याने पुणे विद्यापीठाने परीक्षेची तयारी करून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in