मुंबई | मराठा आरक्षणावर आज सर्वोच्च न्यायालयाने मत मांडले आहे. न्यायलय योग्यरित्या सुरु झाल्यास आपण मराठा आरक्षणावर निकाल देऊ असं न्यायालयाने यावेळी म्हटले आहे. व्हिसी द्वारे निकाल देऊ शकत नाही असं स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. सर्वोच्च न्यायालयातील आजची मराठा आरक्षणा संदर्भातील सुनावणी संपली असून अंतरिम आदेशासाठी १५ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश आरक्षणावरही १५ जुलै ला सुनावणी होणार आहे.
राज्याच्या तत्कालीन फडणवीस सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 16 टक्के आरक्षण देण्याची तरतूद मराठा आरक्षण विधेयकात केली होती. यामध्ये ओबीसी समाजाला कुठलाही धक्का न लावता एसईबीसी या विशेष प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले. 1 डिसेंबर 2018 पासून राज्यात मराठा आरक्षण विधेयक लागू करण्यात आले आहे.
राज्य सरकारने मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीत 16 टक्के आरक्षण जाहीर केल्यानंतर नोकरीतील आरक्षणाला उच्च न्यायालयाने यापूर्वी स्थगिती दिली होती. त्यानंतर आरक्षण विरोधी याचिकाकर्त्यांनी शैक्षणिक आरक्षणालाही स्थगितीची मागणी केली होती. मात्र उच्च न्यायालयाने मराठा समाजाचं शैक्षणिक आरक्षण अबाधित ठेवलं आहे.