मराठा आरक्षणाच्या प्रश्नाला पुन्हा ‘नवी तारीख’; २८ ऑगस्ट रोजी होणार पुढील सुनावणी

नवी दिल्ली | मराठा आरक्षण प्रकरणाची सुनावणी मोठ्या खंडपीठाकडे जाणार असंच चित्र आज सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत दिसून आलं. आजच्या सुनावणीवेळी आरक्षणावर राज्य सरकारचे वकिल मुकुल रोहोतगी, मध्यस्थांचे वकिल कपिल सिब्बल आणि याचिकाकर्ते विनोद पाटील यांचे वकिल नरसिंह यांनी जोरदार युक्तीवाद केला. दरम्यान, आज कोणताही निर्णय होऊ शकला नाही, याची पुढील सुनावणी २८ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली.

कोर्टात कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद करताना मराठा आरक्षण प्रकरण ११ न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे वर्ग करायला हवं अशी मागणी केली. तर मुकुल रोहतगी यांनी इंद्रा सहानी प्रकरणाचा दाखला देत मराठा आरक्षण प्रकरणाची चर्चा मोठ्या खंडपीठात व्हावी अशी मागणी केली.

मराठा आरक्षणप्रकरणी निकाल देताना मुंबई हायकोर्टानं ५० टक्क्यांहून पुढे जाणाऱ्या या आरक्षणाला वैध ठरवलं होतं. केंद्र सरकारनेही ५० टक्क्यांपेक्षा अधिक १० टक्के आरक्षणाचा कायदा केला आहे. तसेच इंद्रा सहानी प्रकरणात नऊ न्यायमूर्तींच्या खंडपीठाने ५० टक्क्यांचा मर्यादा ओलांडण्यासाठी काही अपवाद असतील असं म्हटलं होतं. दरम्यान, मराठा आरक्षण प्रकरण सध्या केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रकरणांमध्ये गुंतलेली आहेत. त्यामुळे हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे जाण्याची गरज असल्याचे रोहतगी म्हणाले.