हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टपाल खात्याकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी एक नवीन उपक्रम राबविण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्टॅम्प संग्रहित करण्याची आवड निर्माण करण्याच्या हेतूने सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘दीनदयाल स्पर्श योजना’ नावाची शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली आहे. या शिष्यवृत्तीचा शालेय स्तरावरील स्टॅम्प क्लब असलेल्या विद्यार्थ्यांना लाभ घेता येणार आहे. टपाल खात्याकडून देण्यात येणारे फिलाटेलिक स्टॅम्प संग्रहित करण्याची आवड अनेक विद्यार्थ्यांना आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा हा छंद जोपासण्यासाठी टपाल खात्याने या शिष्यवृत्तीची घोषणा केली आहे.
या शिष्यवृत्ती अंतर्गत सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांची कर्नाटक मंडल स्तरावर फिलाटेलिक प्रश्नमंजुषा आणि मुद्रांक संकलन स्पर्धा घेण्यात येईल. या स्पर्धेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना २०२३-२४ या वर्षासाठी शिष्यवृत्ती दिली जाईल. या शिष्यवृत्तीची रक्कम वर्षाला 6 हजार असून दरमहा विद्यार्थ्यांच्या किंवा त्यांच्या पालकांच्या खात्यावर 500 रुपये जमा केले जातील. परंतु ही शिष्यवृत्ती घेण्यासाठी टपाल खात्याने विद्यार्थ्यांसाठी काही अटी ठेवल्या आहेत.
त्यानुसार, या शिष्यवृत्तीचा लाभ घेणारा विद्यार्थी हा मान्यताप्राप्त शाळेचा विद्यार्थी असावा तसेच त्या शाळेतील फिलाटेलिक क्लबचा सदर विद्यार्थी सदस्य असायला पाहिजे. या शिष्यवृत्तीमध्ये पात्र ठरण्यासाठी विद्यार्थ्याला वार्षिक परीक्षेत किमान 60 टक्के गुण मिळालेले असावेत. टपाल खात्याने या शिष्यवृत्तीसाठी 50 प्रश्नांची प्रश्नमंजुषा ठेवली आहे. स्टॅम्प संकलनाच्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत विद्यार्थ्याला 50 प्रश्न विचारले जातील. हे प्रश्न चालू घडामोडी, इतिहास, विज्ञान, क्रीडा, संस्कृती, भूगोल, संगणक, अशा सर्व विषयांवर आधारित असतील.
दरम्यान, टपाल खात्याने या शिष्यवृत्तीविषयी सर्व माहिती खात्याच्या www. karnatakapost.gov.in या संकेतस्थळावर दिली आहे. मुख्य म्हणजे, या शिष्यवृत्तीसाठी बेळगावमधील विद्यार्थी देखील सहभाग नोंदवून शकतात. टपाल खात्याकडून देण्यात येणारे स्टॅम्प छंद म्हणून संग्रहित करण्याची विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण झाली आहे. त्यामुळेच या छंदाचा त्यांच्या शालेय जीवनात फायदा होण्यासाठी टपाल खात्याकडून ही शिष्यवृत्ती घोषित करण्यात आली आहे.