अभिमानास्पद!! कान्समध्ये झळकला सिद्धूचा मराठी सिनेमा; स्पेशल स्क्रिनिंग पडले पार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। हिंदी चित्रपटाच्या इतिहासातील ‘शोले’ हा चित्रपट आजही प्रचंड लोकप्रिय आहे. या चित्रपटानं लोकप्रियतेचे मापदंड बदलले, अनेक कलाकारांचं करिअर घडवले. अशा या ‘शोले’ चित्रपटाच्या महानतेला ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ या मराठी चित्रपटातून सलाम करण्यात आला आहे. आपल्या नावामुळेच चर्चेत असलेल्या ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ या चित्रपटाचे स्क्रीनिंग नुकतेच प्रतिष्ठित अशा कान्स फिल्म फेस्टिवल २०२४ मध्ये करण्यात आले. ज्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

कान्समध्ये ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’चा बोलबाला

अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या यंदाच्या सोहळ्यात ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ या चित्रपटाचे स्क्रीनिंग करण्यात आले. याप्रसंगी चित्रपट निर्माते शेहजाज सिप्पी, सगून वाघ यांचा सत्कार पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल आणि निर्मात्या श्रीदेवी शेट्टी वाघ आणि जीत वाघ यांचा सत्कार स्वाती म्हसे I.A.S.MD महाराष्ट्र चित्रपट मंच आणि सांस्कृतिक विकास कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या हस्ते करण्यात आला. रसिक प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद या चित्रपटला मिळाला.

जबरदस्त स्टारकास्ट

राजेश डेम्पो, भक्ती डेम्पो, सगूण वाघ, श्रीदेवी शेट्टी वाघ यांनी ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. शोले मीडिया अँड एंटरटेन्मेंट, कुबेरन्स टेक व्हेंचर्स चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर जीत वाघ असोसिएट प्रोड्यूसर आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन हृषिकेश गुप्ते यांनी केलं आहे. या चित्रपटातून अभिनेते दिलीप प्रभावळकर, अभिनेता सिद्धार्थ जाधव, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता दातार, मिलिंद शिंदे, किशोर कदम बालकलाकार श्रीरंग महाजन अशी दमदार स्टारकास्ट असून अभिनेते आनंद इंगळे, समीर धर्माधिकारी हे पाहुण्या कलाकारच्या भूमिकेत झळकले आहेत.

सिद्धार्थ जाधवने व्यक्त केला आनंद

‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ जाधव मध्यवर्ती भूमिकेत आहे. त्यामुळे कान्समध्ये आपला मराठी सिनेमा गेल्याचा आनंद त्याने व्यक्त केला आहे.

काही दिवसांपूर्वी त्याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आपला सिनेमा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये झळकणार असल्याची माहिती दिली होती. सोबतच हा अभिमानाचा क्षण असल्याचेही त्याने या पोस्टमध्ये म्हटले होते. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती.