सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्याला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात दुसऱ्या लाटेच्या 4 महिन्याच्या कालावधीत 1 हजार 500 मृत्यू झाले आहेत. यामध्ये आतापर्यंत साताऱ्यात 0 ते 14 वयातील 10 हजार 122 लहान मुले बाधित झाले असून 3 मृत्यू झाले आहेत. तिसऱ्या लाटेचा धोका हा लहान मुलांना असल्याचा अंदाज तज्ञाकडून व्यक्त केला जात असल्याने साताऱ्यात तीन ठिकाणी लहान मुलांसाठी कोरोना वॉर्ड तयार करण्यात येत असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
सातारा जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत 86 हजार 560 रुग्ण बाधित झालेले आहेत. तर दुसऱ्या लाटेत 1 हजार 500 बाधितांचा मृत्यू झाला आहे. लहान मुलांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालय, निरामय हॉस्पिटल व चिरायू हॉस्पिटल येथे बेडची सोय करण्यात आलेली आहे. सध्या 150 बेड तिथे आहेत. जिल्ह्यात दररोज 4 ते 5 कोरोना बाधित मुलं येत आहेत, त्यामध्ये किमान दोन मुले रूग्णालयात अॅडमिट होत आहेत. त्यामुळे रूग्णसंख्या वाढत आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधित लहान मुलांचे प्रमाण वाढत आहे. तेव्हा बालरोग तज्ञ डाॅक्टरांनी पुढाकार घ्यावा. तसेच लहान मुलांसाठी जिल्ह्यात वाॅर्ड वाढविण्यात येणार असल्याची माहीती डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.