हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या टी-20 वर्ल्डकपमध्ये अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला नमवत टीम इंडियाने विश्वचषक जिंकला. या विजयानंतर सर्वजण जल्लोषात गुंग असताना कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) अचानक खेळपट्टीच्या मध्ये गेला आणि खेळपट्टी वरील माती त्याने चाखली. रोहितच्या या कृतीने सर्वांचीच मने जिंकली. मात्र रोहितने असं का केलं? खेळपट्टी वरील माती चाखून त्याला काय मिळालं? असा प्रश्न सर्वाना पडला. यावर आता खुद्द रोहीतनेच खुलासा करत खेळपट्टी वरील माती चाखण्यामागचं कारण सांगितलं आहे. (Rohit Sharma Taste The Soil Of The Barbados)
रोहित म्हणाला, मी त्या खेळपट्टीवर गेलो कारण त्या पीचने मला वर्ल्डकप जिंकवून दिला. आम्ही त्या पीचवर खेळलो. ही तीच खेळपट्टी होती जिने मला विजय मिळवून दिला. त्यामुळे हे पीच आणि ते ग्राऊंड आयुष्यभर माझ्या लक्षात राहणार आहे. त्यामुळे मला खेळपट्टीचा लहानसा भाग कायम स्वतःसोबत ठेवायचा होता. मी वर्ल्डकप जिंकण्याच्या गोष्टींचं वर्णन करूच शकत नाही, कारण त्या गोष्टी स्क्रिप्टेड नव्हत्या. मी त्या क्षणाचा आनंद घेत होतो. त्यावेळचे सर्व फार महत्त्वाचे होते असं म्हणत रोहित शर्माने आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, तब्बल १७ वर्षानंतर भारताने टी-20 वर्ल्डकपवर आपलं नाव कोरल. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत टीम इंडिया चॅम्पियन ठरली. कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या भारताच्या विजयाचे मुख्य हिरो ठरले. कपिल देव आणि महेंद्रसिंघ धोनी यांच्यानंतर भारताला वर्ल्डकप जिंकवून देणारा रोहित शर्मा हा तिसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. भारताला विश्वचषक जिंकवून दिल्यानंतर रोहित शर्माने टी-20 क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली. खरं तर माझ्या मनात निवृत्तीचा विचार नव्हता परंतु यापेक्षा मोठा क्षण निवृत्तीसाठी असू शकत नाही असं म्हणत रोहित आपल्या निर्णयावर ठाम राहिला.