औरंगाबाद – कोणतीही मोठ्या पदावरील व्यक्ती त्या पदावर जाण्याऐवजी आधी माणूस असते. मग कितीही मोठे पद मिळाले तरी तिच्यातील माणुसकी जिवंत राहिली पाहिजे, असे नेहमी बोलले जाते. औरंगाबादेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनीही याचा दाखला दिल्याचे नुकतेच दिसून आले. आज रविवार 24 ऑक्टोबर रोजी औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ झालेला रस्त्यावरील अपघात पाहताच डॉ. भागवत कराड यांनी गाडी थांबवत आधी त्या अपघात ग्रस्ताची मदत केली. एवढेच नव्हे तर जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केल्यावरच ते पुढील प्रवासाला निघाले. केंद्रीय अर्थराज्य मंत्रीपदावर पोहोचलेल्या डॉ. कराड यांनी आज माणुसकीचे दर्शन घडवून दिले. औरंगाबादमध्ये सध्या या दाखल्याचीच चर्चा सुरु आहे.
अपघात झाल्यावर सहसा कुणी थांबत नाही. पुढे होऊन मदत करत नाहीत. त्यातला कुणी नेता, राजकारणी किंवा महत्त्वाचा अधिकारी असेल तर त्याचा ताफा कधीही अशा ठिकाणी थांबत नाही. मात्र रविवारी डॉ. भागवत कराड यांनी मात्र आदर्श दाखला दिला. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ रस्त्यावर झालेला रिक्षाचा अपघात पाहताच डॉ. कराड यांनी इतर गाड्या थांबवत आधी अपघात ग्रस्त रुग्णांची तपासणी केली. या अपघातात एका मुलाच्या तोंडाला मार लागला होता. त्यामुळे रक्तस्राव सुरु होता. अशा वेळी डॉ. कराडांनी हात रुमालाने त्याचे रक्त साफ करून त्या मुलाला धीर दिला. त्यानंतर सर्व जखमींची शासकीय रुग्णालयात रवानगी केली आणि त्यानंतर डॉ. कराड पुढील प्रवासाला लागले.
डॉ. भागवत कराड हे राजकारणात येण्यापूर्वी डॉक्टर होते. त्यांच्या डॉक्टरकीच्या कारकीर्दीतील असंख्य उदाहरणे, असंख्य आठवणी सांगणारे लोक आज औरंगाबाद शहरात आहेत. अशा वेळी एक डॉक्टर या नात्याने डॉ. कराड यांनी केलेली अपघात ग्रस्ताची मदत हा आज औरंगाबाद शहरासाठी कौतुकाचा विषय ठरत आहे.