हॉटेल्स, बारमध्ये गर्दी पाहून जिल्हाधिकारी शेखरसिंह प्रशासनावर संतापले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना हॉटेल्स, बारमध्ये गर्दी दिसत आहे. तालुक्यात कोणतीही कारवाई होत नसल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. नियम मोडणारे हॉटेल्स, बार, मॉल्स, मंगल कार्यालये यांच्यावर दंडात्मक कारवाई करून ती सात दिवसासाठी सील करण्याच्या सूचना त्यांनी तालुका प्रशासनाला दिल्या.

तालुक्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारी कराड तालुका प्रशासनाची बैठक जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली येथील शासकीय विश्रामगृहावर पार पडली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पो.नि.बी.आर. पाटील यांच्यासह सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/468709791209773

तालुक्यातील कोरोना परिस्थिती,  रूग्ण संख्या, लसीकरण याचा आढावा शेखर सिंह यांनी घेतला. यावेळी ते म्हणाले, कराड शहर व तालुक्यात बार, हॉटेल्स, मॉलमध्ये गर्दी दिसून येत आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सध्याचे निर्बंध अधिक कडक करण्यात येत आहेत. निर्बंध डावलून जी दुकाने उघडी दिसतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.  हॉटेल्स, मंगल कार्यालयात गर्दी दिसल्यास त्यांना 25 हजार ते एक लाखांपर्यंत दंड करणार आहोत.  बार, रेस्टॉरंट वाईन शॉपमध्ये गर्दी दिसल्यास त्यांना दंडात्मक कारवाईबरोबर ती दुकाने सात दिवसांसाठी सील करणार आहोत. पुढील काळात राज्य शासन जे निर्णय घेईल त्याची अंमलबजावणी सातारा जिल्हयात काटेकोर केली जाईल.

कोरोना चाचण्या वाढविणे, रूग्णांच्या संपर्कातील कॉन्टॅक्ट शोधने, हॉस्पिटलची तयारी, बेड मॅनेजमेंट सॉफ्टवेअरव्दारे रोजची माहिती ठेवणे याबाबत आरोग्य विभागाला सूचना केल्या आहेत. शिवाय काही हॉस्पिटल्स पुन्हा अधिगृहीत करण्यात येणार आहेत. यासाठी शारदा क्लिनीक, सह्याद्रि, श्री हॉस्पिटल यासह काही हॉस्पिटल चालकांना बोलावले होते.कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देत आहोत. शिवाय आरोग्य उपकेंद्रात लसीकरणाची सुविधा उपलब्ध करत असल्याचे शेखर सिंह यांनी सांगितले.