औरंगाबाद | जिल्ह्यासह शहरात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. त्याचा फटका उद्योगांसह खासगी तसेच शासकीय प्रवासी वाहतुकीवर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या शिवनेरी (व्हाॅल्हो) बसेसची काहीशी अवस्था झाली आहे. औरंगाबादच्या मध्यवर्ती बसस्थानकावरून सुटणा-या लांब पल्ल्याच्या बसेस दररोज हजारो रुपयांनी तोट्यात चालल्या असून, महामंडळाच्या गाड्यांमधून प्रवासी संख्या रोडावली आहे. त्यात प्रवाशांना कोरोना टेस्टची भीती वाटत आहे. बसमध्ये बसण्याअगोदर चाचण्या केल्या जातात. त्यामुळे प्रवाशांना भीती वाटते, असेही काहींनी सांगितले.
एसटी बसला प्रवाशांअभावी दररोज १२ ते १५ हजारांच्या उत्पन्नावर पाणी फिरवावे लागत आहे. आधीच देशावर कोरोनाचे संकट कायम असताना राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवर त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर झाला आहे. या बसेसच्या माध्यमातून महामंडळाला महिन्याकाठी लाखोंचे उत्पन्न मिळते. या कमी झालेल्या प्रवासी संख्येने रोजचा खर्च निघणेही मुश्कील झाले आहे. परिणामी कमी प्रवाशांमध्ये महामंडळाला बसेस चालवाव्या लागत आहे. दुसरीकडे खासगी प्रवासी वाहनांमध्ये व वेगवगळ्या ट्रॅव्हल्स कंपन्यांचा बसेसकडे प्रवाशांचा कल वाढत आहे.
सध्या मोठ्या प्रमाणावर शिवनेरी बसला नुकसान सहन करावे लागत असल्याने तोट्यात चाललेली आहे. अशा परिस्थितीत वाहक, चालकांचे पगार कसे निघणार हाही प्रश्न उपस्थित राहू शकतो. कोरोनाच्या वाढत्या प्रमाणामुळे लोकांनी एसटी बसकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.