कुख्यात गुन्हेगाराच्या घरातून सहा तलवारीसह घातक हत्यारे जप्त; गरमपाणी भागात गुन्हेशाखेची कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंंगाबाद | गरमपाणी भागात कुख्यात गुन्हेगाराच्या घरावर छापा मारून गुन्हेशाखा पोलिसांनी सहा तलवारी, एक गुप्ती, एक कुकरी असा शस्त्रसाठा जप्त केला. शेख इर्शाद उर्फ ईशु शेख सईद (२५,रा.गरमपाणी, मध्यवर्ती बसस्थानकाच्या पाठीमागे) असे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. तर शेख जाकेर शेख समशोद्दीन (वय २४) असे फरार आरोपीचे नाव आहे.

गरमपाणी भागात कुख्यात गुन्हेगार शेख इर्शाद उर्फ ईशु याच्या घरात अवैधरित्या शस्त्रांचा साठा असल्याची माहिती गुन्हेशाखेला मिळाली होती. गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त रविंद्र साळोखे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश धोंडे यांच्या पथकाने शेख इर्शाद उर्फ इशु याला सोमवारी सायंकाळी मध्यवर्ती बसस्थानकासमोरून ताब्यात घेवून चौकशी केली असता तो सुरूवातील उडवा-उडवीची उत्तरे देत होता. पोलिसांनी त्याला खाक्या दाखविताच त्याने शस्त्रसाठा आपला मित्र शेख जाकेर याच्या घरात ठवेला असल्याची कबूली दिली. गुन्हेशाखा पोलिसांनी शेख जाकेर याच्या घरावर छापा मारला असता शेख जाकेर मिळून आला नाही. पोलिसांनी शेख जाकेर याच्या वडीलांच्या समक्ष घराची झडती घेतली असता स्वयंपाक घरातील पोटमाळ्यावर एका पांढऱ्या रंगाच्या गोणीत सहा तलवारी, एक गुप्ती आणि एक कुकरी पोलिसांना मिळून आली. याप्रकरणी कुख्यात शेख इर्शाद उर्फ इशु व त्याचा साथीदार शेख जाकेर याच्याविरूध्द क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑनलाईन तलवारी मागविणारे आणखी चौघे गजाआड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राशेद सालमीन दिप (वय २२), शेख आरबाज शेख शेरु (वय २१), मोहम्मद फरदीन मोईन बागवान (वय १९, तिघे रा. इंदिरानगर बायजीपुरा) आणि फैजान हारुण कुरेशी (वय २०, रा. चिकलठाणा) अशी अटकेतील ऑनलाईन तलवारी आणि गुप्ती मागविणाऱ्यांची नावे आहेत. या अगोदर कुरिअरने तलवारी मगवणाऱ्या आरोपीविरोधात सापळा रचत पुंडलिकनगर आणि जिन्सी पोलिसांनी संयुक्त कारवाई करित ईरफान ऊर्फ दानिश खान याला अटक करुन त्याच्या ताब्यातून ४१ तलवारी, सहा कुकरी, दोन गुप्त्या जप्त केल्या होत्या. पोलीस कोठडी दरम्यान इरफान खान उर्फ दानिश खान याने चौघा आरोपींसह अबुजर खान जफर खान (रा. जाली दर्गा) आणि सय्यद मुजाहेद ऊर्फ मुज्जू सय्यद हबीब (रा. किराडपुरा) यांना तलवारी व गुप्ती विक्री केल्याची कबुली दिली. त्यानुसार, पोलिसांनी वरील चौघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून चार तलवारी व एक गुप्ती जप्त केली.

Leave a Comment