सांगली | सांगलीत बंदी असतानाही लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करीत मध्यरात्री पासून पहाटे अवैधरित्या भरलेल्या होलसेल भाजी आणि आंबे विक्रीवर बाजारावर सांगली महापालिका आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आहे. पहाटे करण्यात आलेल्या या कारवाईत मोठ्या प्रमाणात भाजीपाला आंब्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार मनपा उपायुक्त राहुल रोकडे आणि पोलीस निरिक्षक अजय सिंधकर यांच्या पथकाने संयुक्त कारवाई केली.
यावेळी कोल्हापूर रोड, रामनगर, फळ मार्केट परिसरात अवैधरीत्या होलसेल व्यापाऱ्यांनी आंबा आणि भाजीपाला मालाची विक्री सुरू केली होती. यामुळे पहाटेच्या सुमारास किरकोळ विक्रते आणि नागरिक यांची गर्दी होऊन कोरोना संसर्ग पसरण्याची शक्यता होती. याबाबत मार्केट कमिटी तसेच महापालिका प्रशासनाकडून वारंवार संपूर्ण लॉकडाऊन असल्याने होलसेल बाजार भरवू नये किंवा अवैधरित्या विक्रीसाठी कोणीही सार्वजनिक ठिकाणी व्यापारासाठी एकत्र येऊ नये अशा देण्यात आल्या होत्या. मात्र तरीही शासनाच्या नियमांचे उल्लंघन करीत अवैधरित्या शहरात आड मार्गावर भाजी तसेच आंब्याचा होलसेल बाजार भरवला जात होता.
वारंवार सूचना देऊनही व्यापारी उल्लंघन करीत असल्याचे निदर्शनास आल्याने गुरुवारी पहाटेच्या सुमारास महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार उपायुक्त राहुल रोकडे आणि शहर पोलीस निरीक्षक अजय सिंधकर यांनी आपल्या पथकासह पहाटेच्या सुमारास कोल्हापूर रोड, रामनगर, फळ मार्केट, आकाशवाणी परिसरात अनेक ठिकाणी पाहणी करता अवैधरीत्या होलसेल भाजीपाला विक्री सुरू असल्याचे तसेच आंब्याची विक्री सुरू असल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे संयुक्त पथकाने होलसेल बाजारावर कारवाई करत व्यापाऱ्यांचा संपूर्ण माल जप्त केला आहे. तसेच कोल्हापूर रोडवरील एका ठिकाणी सुरू असणारा आंब्याचा होलसेल व्यापारावर सुद्धा पथकाने कारवाई करीत होलसेल बाजारातील आंब्याचा साठा जप्त केला.