वेणूताई चव्हाण ट्रस्टवर सारंग पाटील यांची निवड

कराड | कराड येथील सौ. वेणूताई चव्हाण स्मारक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्तपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माहिती व तंत्रज्ञान सेलचे प्रदेशाध्यक्ष व खासदार श्रीनिवास पाटील यांचे सुपूत्र सारंग पाटील यांची निवड करण्यात आली.

या ट्रस्टचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी सारंग पाटील यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले. सौ.वेणूताई चव्हाण स्मारक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाची 33 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी पार पडली. यावेळी विश्वस्त कै. अशोकराव चव्हाण यांच्या रिक्त जागी सारंग पाटील यांची निवड करण्यात आली.

खा.शरद पवार यांच्यासह विश्वस्त माजी खासदार कल्लापाण्णा आवाडे, पालकमंत्री तथा कार्यकारी विश्वस्त ना.बाळासाहेब पाटील, नंदकुमार बटाणे, राजेश पाटील, सुनील पवार आदी विश्वस्त तसेच खासदार श्रीनिवास पाटील उपस्थित होते. खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर हेही ट्रस्टच्या विश्वस्त पदावर आहेत. या समेत विषय पत्रिकेवरील अन्य विषयांनाही मंजुरी देण्यात आली.