सांगली ः गतवर्षी जेजुरी (जि. पुणे) येथील अहिल्यादेवींच्या पुतळा अनावरण कार्यक्रमापुर्वी हुल्लडबाजी करताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि कार्यकर्त्यांनी अहिल्यादेवींची अवहेलना केली होती. त्याची पुनरावृत्ती सांगलीत घडल्यास २७ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करू, असा इशारा धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी दिला आहे.
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने उभारलेल्या स्मारकाचे उदघाटन हे शांतता आणि आनंदी वातावरणात व्हायला हवे, मात्र भाजपकडून तिथे दंगलसदृश्य परिस्थिती तयार केली जात आहे. हे विकृत राजकारण मोडून काढले पाहिजे, असेही ढोणे यांनी म्हटले आहे. ढोणे यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. अहिल्यादेवींचे स्मारक हे राजकारणाचा अड्डा केला जात असून तिथे जेजुरीच्या घटनेची पुनरावृत्ती करण्याचा डाव असल्याने कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन महापालिका आणि पोलिस प्रशासनाशी बोलून योग्य निर्णय घ्यावेत, असे म्हटले आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी जेजुरी (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळा कार्यक्रमापुर्वी १३ फेब्रुवारी २०२१ रोजी हुल्लडबाजी केली होती. यावेळी अहिल्यादेवींचा पुतळा हलत होता. अहिल्यादेवींचा अध्यात्माचा विचार दिला, तिथे पडळकर दंगल करत होते. यासंदर्भात जेजुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, मात्र याप्रकरणी अटकेची कारवाई केलेली नाही. त्यामुळे पडळकरांचे धाडस वाढलेले आहे. त्यामुळे सांगलीतही असाचा प्रकार करण्याचे त्यांचे नियोजन आहे. त्यादृष्टीकोनातून बैठका सुरू आहेत. सुरूवातीला २ एप्रिल २०२२ रोजी स्मारक उदघाटनाच्या नियोजनात एकमत दिसत होते, मात्र नंतर भाजपने वेगळी भुमिका घेतली. २७ मार्च २०२२ रोजी जबरदस्तीने स्मारकाचे उदघाटन करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे. त्याप्रमाणे भाजपकडून हुल्लडबाजी होणार हे गृहित आहे. ती रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर उपाययोजना करावी. पडळकर यांच्यासोबत भाजपच्या स्थानिक नेत्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी आमची मागणी असल्याचे ढोणे यांनी सांगितले.
धनगर समाजाच्या नावाखाली पडळकर यांच्याकडून सुरू असलेल्या विकृत राजकारणाविरोधात आम्ही सातत्याने भुमिका घेतली आहे. मात्र पडळकर भाजपच्या नेत्यांना खुश करण्यासाठी अतिशय खालच्या पातळीवर जात आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे पोलिस विभाग नेभळट भुमिका घेत आहे. जेजुरीसारखा प्रकार सांगलीत घडल्यास ते सांगली जिल्ह्याच्या परंपरेला शोभणारे नाही. त्यामुले तसे काही घडल्यास २७ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाची भुमिका जाहीर केली असल्याचे ढोणे यांनी सांगितले.