जेष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे निधन; वयाच्या 89 वर्षी घेतला अखेरचा श्वास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे निधन झाले. वयाच्या 89 वर्षी त्यांनी नवी मुंबईतील नेरूळ येथे अखेरचा श्वास घेतला. बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी 27 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, बाबा माहाराज सातारकर यांचं पार्थिव आज दुपारी तीननंतर अंतिम दर्शनासाठी नेरूळ जिमखाना समोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदीरात ठेवण्यात येईल.

ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी सातारा येथे झाला. त्यांनी त्या काळी दहावीपर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून केले. बाबा महाराज सातारकर यांच्या घरी शेकडो वर्षांपासून वारकरी सांप्रदायाची परंपरा आहे. ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांनी आपले आयुष्य अध्यात्माच्या प्रचार प्रसारासाठी अर्पण केले. रोखठोक वाणी आणि शुद्ध विचार हे बाबा महाराज सातारकर यांचे व्रत होते. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांचे प्रबोधन केले.

बाबा महाराज सातारकर यांनी 1983 पासून संतांच्या गावी दरवर्षी कीर्तन सप्ताह आयोजन करण्याची परंपरा सुरू केली. यात त्यांनी भंडारा डोंगर, देहू, त्र्यंबकेश्वर, नेवासे, पैठण, पंढरपूर, पिंपळनेर इत्यादी ठिकाणी कीर्तन सप्ताहांचं आयोजन केले. यावर्षीच्या सुरुवातीलाच फेब्रुवारी महिन्यात बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी रूक्मिणी सातारकर ऊर्फ माई सातारकर यांचं निधन झाले होते. त्यानंतर 8 महिन्यानंतर बाबा महाराज सातारकर यांचीही प्राणज्योत मालवली.

विशेष म्हणजे गेल्या तीन पिढ्यांपासून नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे उर्फ ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकरांच्या घरात कीर्तनाची आणि प्रवचनाची परंपरा जोपासली जाते आहे. ह. भ. प. बाबा महाराजांनी हीच परंपरा पुढे सुरू ठेवली. बाबा महाराजांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती.