ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांचे निधन; वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

0
2
Res. Rm. Borade
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मराठी साहित्यविश्वातील ज्येष्ठ कथाकार आणि कादंबरीकार रा. रं. बोराडे (Raosaheb Rangnath Borade) यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते ८५ वर्षांचे होते. आपल्या साध्या, सोप्या आणि हृदयस्पर्शी लेखनशैलीमुळे त्यांनी मराठी वाचकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते. आज त्यांच्या जाण्याने मराठी साहित्य क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.

रा. रं. बोराडे यांच्या विषयी….

रा. रं. बोराडे यांचा जन्म लातूर जिल्ह्यातील काटगाव या छोट्या खेड्यात झाला. त्या काळी काटगाव अत्यंत मागासलेले गाव होते आणि तेथे शाळेचीही सोय नव्हती. त्यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण खाजगी शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना बार्शी आणि नंतर सोलापूरला जावे लागले. त्यांनी सोलापुरातील दयानंद महाविद्यालयातून पदवी संपादन केली आणि औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठातून मराठीत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९६३ मध्ये त्यांनी विनायकराव पाटील यांनी स्थापन केलेल्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वैजापूर येथील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यभार सांभाळला. १९७१ मध्ये ते या महाविद्यालयाचे प्राचार्य झाले आणि आपल्या कर्तृत्वाने वैजापूरसारख्या छोट्या गावाला शैक्षणिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वाचे स्थान मिळवून दिले. नंतर ते औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयाचे आणि परभणीतील श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य झाले. २००० साली त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.

रा. रं. बोराडे यांचे साहित्य

रा. रं. बोराडे यांनी मराठी साहित्याला समृद्ध करणाऱ्या अनेक कथा आणि कादंबऱ्या लिहिल्या. ‘पाचोळा’ या त्यांच्या गाजलेल्या कादंबरीमुळे त्यांना ‘पाचोळाकार बोराडे’ अशी ओळख मिळाली. त्यांच्या लेखनात ग्रामीण जीवनाचा अनुभव आणि सखोल अभ्यास प्रकर्षाने जाणवत असे. मात्र आता रा. रं. बोराडे यांच्या निधनामुळे मराठी साहित्यविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.