हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज भारतीय रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत सातत्याने घसरत असून एक डॉलर 88 रुपयापर्यंत पोहोचला आहे. रुपयात होणारी हि घसरण महागाई वाढण्याचा इशारा आहे. त्यामुळे येत्या काही काळात सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे. विजेपासून ते पेट्रोल, डिझेल, सोलर पॅनल, एलईडी टीव्ही आणि इतर वस्तूंच्या किमती वाढू शकतात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
25 टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय –
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्कात वाढ केली आहे. त्यांनी स्टील आणि ॲल्युमिनियमवर 25 टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे याचा परिणाम वस्तू आणि सेवांवर होताना दिसणार आहे. परिणामी महागाईचा दर वाढणार आहे. तसेच परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून पैसे काढून घेत आहेत. या परकीय गुंतवणूकदारांच्या हालचालींमुळे रुपयावर दबाव वाढला आहे.
अनेक क्षेत्रांमध्ये महागाई वाढण्याची शक्यता –
रुपयाच्या घसरणीमुळे अनेक वस्तूंच्या किमती वाढू शकतात. यामध्ये वीज, पेट्रोल, डिझेल, सौर पॅनेल, इलेक्ट्रिक वाहने, टीव्ही आणि इतर घरगुती वस्तूंच्या किमतींमध्ये वाढ होऊ शकते. भारत पेट्रोल, डिझेल, सौर पॅनेल आणि टीव्ही पॅनल सारख्या वस्तू डॉलरमध्ये आयात करतो, आणि रुपयात घसरण झाल्यामुळे या वस्तूंच्या खरेदीसाठी जास्त खर्च होतो. यामुळे कंपन्यांना अतिरिक्त आर्थिक बोजा सहन करावा लागतो, ज्यामुळे ते आपल्या वस्तूंच्या किमती वाढवतात. रुपयाच्या घसरणीमुळे भारतातील अनेक क्षेत्रांमध्ये महागाई वाढण्याची शक्यता आहे. येत्या काळात विविध वस्तूंच्या किमतींमध्ये वाढ होऊ शकते, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या दैनंदिन खर्चावर होईल.