राज्यात पीक साठवणुकीसाठी उभी करा शीतगृहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कांद्याप्रमाणे ज्या पिकांना साठवणुकीची गरज आहे त्यासाठी राज्यभर साठवणूक केंद्र, शीतगृहांची उभारणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी कृषी विभागाला दिले आहेत. ग्रामीण भागातील लहान शेतकऱ्यांसाठी पायाभूत सुविधा उभारण्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पुढे यावे, असे आवाहनही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. राज्य शासन, नाफेड आणि महाएफपीसी यांच्या माध्यमातून देशातील पहिला कांदा साठवणूक व सुविधा प्रकल्प असलेला ‘महाओनियन’ प्रकल्पाचा ई-लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, “याप्रकल्पाच्या माध्यमातून उद्योग आणि कृषी विभाग हातात हात घालून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एकत्र आले आहेत. शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेल्या शेतमालाला हमी भावापेक्षा हमखास भाव मिळाला पाहिजे यासाठी ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेतून शेतकऱ्यांना सुखी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी एकत्र येऊन कांदा साठवणुकीचे प्रकल्प उभारले आहेत. याप्रमाणेच ज्या पिकांना साठवणुकीची गरज आहे त्यासाठी राज्यभर ठिकठिकाणी साठवणूक केंद्रे निर्माण केली पाहिजेत”

ते म्हणाले, “शेतकरी बांधव सर्वस्व पणाला लावून कांदा पिकवतो अशा वेळेला जर त्याला भाव मिळाला नाही तर त्याच्यावर आर्थिक संकट कोसळतं. कधीकधी शेतकऱ्याने पिकविलेल्या सोन्यासारख्या शेतमालाला माती मोल भाव मिळतो. हे थांबविण्यासाठी बाजारात ज्याला मागणी आहे ते पिकविण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे.” ‘विकेल ते पिकेल’ ही योजना महत्त्वपूर्ण आहे असेही ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment