सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराजांच्या अमृतमहोत्सवी यात्रेस सेवागिरी महाराजांच्या पालखी आणि मानाचा झेंडा मिरवणुकीने आजपासून प्रारंभ झाला. सेवागिरी मंदिरात मान्यवरांच्या उपस्थितीत श्री सेवागिरी महाराजांचा मानाचा झेंडा आणि पालखीचे विधिवत पूजन आणि आरती करण्यात आली. त्यानंतर मंदिराच्या आवारातून झेंडा आणि पालखीच्या मिरवणुकीचे यात्रा स्थळाकडे प्रस्थान करण्यात आले.
मंदिरापासून काढण्यात आलेली पालखी यात्रास्थळावर पोहोचल्यानंतर त्याठिकाणी मठाधिपती श्री सुंदरगिरी महाराज आणि मान्यवरांच्या हस्ते श्री सेवागिरी महाराजांच्या मानाच्या झेंड्याची प्रतिष्ठापना करून या यात्रेस प्रारंभ करण्यात आला.
पुसेगाव येथील सेवागिरी यात्रेस आजपासून पालखी अन् झेंडा मिरवणुकीने प्रारंभ pic.twitter.com/cBIdUdZiO5
— santosh gurav (@santosh29590931) December 18, 2022
यंदा कोरोनाचे संकट पूर्णपणे दूर झाले असल्याने सेवागिरी महाराजांच्या यात्रेस येणाऱ्या भाविकांच्या संख्येत विक्रमी वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या यात्रेसाठी राज्यभरातून भाविक येत असतात. त्यामुळे यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सातारा पोलिसांकडूनही कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. तसेच यात्रेसाठी सुमारे दीडशेहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.