शेलपिंपळगाव : हॅलो महाराष्ट्र – आळंदी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका वारकरी संस्था चालकाने वारकरी शिक्षण घेण्यासाठी आलेल्या ११ वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना घडली आहे. आरोपीचे नाव शिवप्रसाद रामनाथ भोकनळ असे आहे. त्याच्यावर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. यामुळे आता वारकरी शिक्षणाचे धडे शिकण्यासाठी घरदार सोडून येणाऱ्या मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
काय आहे प्रकरण
या मुलाच्या आई वडिलांनी त्याला दोन महिन्यांपूर्वी खाजगी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये वारकरी शिक्षणासाठी पाठवले होते. आरोपी शिवप्रसाद भोकनळ हा मुलांना वारकरी संप्रदायासंदर्भात शिक्षण देत होता. या दरम्यान पीडित मुलाच्या घरी पाहुणे आल्याने त्याच्या आईने त्याला घरी आणले होते. त्यावेळी आरोपी शिवप्रसाद भोकनळ याने पीडित मुलाला तातडीने परत संस्थेत पाठवावे असे सांगितले. यावरून पीडित मुलगा संस्थेत जायचे नाही म्हणून रडायला लागला. यानंतर आईने मुलाला विश्वासात घेऊन विचारले असता त्याने त्याच्याबाबत घडलेला सगळा प्रकार सांगितला.
शिवप्रसादने अनैसर्गिक कृत्य केल्याचे त्या मुलाने आपल्या आईला सांगितले. जेव्हा संस्थेतील सर्व मुले हरिपाठ करण्यासाठी चालले होते त्यावेळी भोकनळने पीडित मुलाला तुझ्याकडे काम आहे असे म्हणून थांबवले. सर्व विद्यार्थी हरिपाठाला गेल्यानंतर त्याच्यावर एका खोलीत अनैसर्गिक कृत्य करण्यात आले.तसेच शिवप्रसादने पीडित मुलाला याची वाच्यता केल्यास तुला बघून घेईल अशी धमकीदेखील दिली होती. याप्रकरणी आळंदी पोलिसात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.