ब्रिजभूषण सिंहांकडून महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण; सनसनाटी आरोपाने खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने (Vinesh Phogat)  भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. देशातील आघाडीच्या कुस्तीपटूंनी बुधवारी (18 जानेवारी) जंतर-मंतर येथे ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात निदर्शने केली. यामध्ये बजरंग पुनिया, संगीता फोगट, सोनम मलिक, अंशू मलिक यांचा समावेश आहे. ब्रिजभूषण सिंह हे भाजपचे खासदार सुद्धा आहेत.

राष्ट्रीय शिबिरांमध्ये नियुक्त केलेले काही प्रशिक्षक वर्षानुवर्षे महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ करत आहेत. डब्ल्यूएफआयचे अध्यक्षही लैंगिक छळात सामील आहेत. अनेक तरुण महिला कुस्तीपटूंनी राष्ट्रीय शिबिरांमध्ये लैंगिक छळ झाल्याबद्दल तक्रारी केल्या आहेत असे सनसनाटी आरोप विनेश फोगट यांनी केले आहेत. आंदोलन करणाऱ्या अन्य पैलवानांनी प्रशिक्षकावर सुद्धा लैंगिक छळाचा आरोप केला आहे. आम्ही ही लढाई शेवटपर्यंत लढणार असून ब्रिजभूषण यांना पदावरून हटवल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा आंदोलक पैलवानांनी दिला.

दरम्यान, ब्रिजभूषण सिंह यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत. मी कोणत्याही खेळाडूला त्रास दिला नाही. खेळाडूंच्या शोषणाचे आरोप चुकीचे आहेत. जे आरोप करत आहेत त्यांनी पुढे यावे असं त्यांनी म्हंटल. कुस्तीपटूंनी लावलेले आरोप निराधार आहेत. जर त्यांचे आरोप सिद्ध झाले तर मी फाशी घेईन असं म्हणत या संपूर्ण प्रकरणामागे एका बड्या उद्योगपतीचा हात असल्याचे शंका त्यांनी व्यक्त केली.