पांचगणी नगरपालिकेच्या मुख्याधिकांऱ्यावर शाईफेक : कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
पांचगणी गिरिस्थांन नगरपालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर आज सकाळी बाजारातील स्वच्छतेबाबत पाहणी करत होते. दरम्यान, बुधवार बाजारपेठेत काळे द्रव्य अंगावर टाकून हल्ला केल्याची घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. याबाबत पांचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पांचगणी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. या प्रकारामुळे पाचगणी, महाबळेश्वर नगरपालिका कर्मचारी संघटना आक्रमक झाली असून त्यांनी या घटनेच्या निषेधार्थ कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केल आहे.

याबाबत पांचगणी पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, आज सकाळी मुख्याधिकारी गिरीश दापकेकर हे रोटरी क्लबच्या रक्तदान शिबिरात उपस्थित राहून त्यांनी रक्तदान ही केले. त्यानंतर आठवडा बाजारात राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियानांतर्गत पथविक्रेते सर्वेक्षणाचे काम व बाजारातील स्वच्छता पाहणी करण्याचे कामासाठी मुख्याधिकारी आले होते. यावेळी बांधकाम मुकादम सूर्यकांत कासुर्डे, स्वच्छता निरीक्षक गणेश कासुर्डे, लिपिक रवींद्र कांबळे व सागर बगाडे शिवाजी चौकात आले. त्या ठिकाणाहून सर्वजण पथविक्रेते सर्वेक्षण तसेच बाजारातील स्वच्छतेबाबत पाहणी करत निघाले होते. महात्मा फुले हायस्कूलचे जुनी इमारतीचे गेट जवळ पोहोचले असता अनमोल अशोक कांबळे (रा. पाचगणी) हा सर्वांचे समोर येऊन त्याने मुख्याधिकारी यांना अडविले. मला नोटीस का काढणार आहात, असे बोलून मुख्याधिकारी यांचा हात पकडुन धक्का देऊन खाली पाडून जखमी केले. तसेच त्याने त्याचे हातातील बाटलीमधील काळे द्रव्य अंगावर टाकून हल्ला केला.

ही घटना वाऱ्यासारखी शहरात पसरताच सर्व पालिका कर्मचारी कार्यालयात जमा झाले. यावेळी काही काळ वातावरण तप्त झाले होते. त्यांनतर मुख्याधिकारी कर्मचाऱ्यां समवेत पोलीस ठाण्यात गेले. कर्मचाऱ्यांनी नगरपालिकेचे काम बंद ठेवून सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांना निवेदन देवून वारंवार कर्मचाऱ्यांना वेठीस धरणाऱ्या या नराधमामुळे कामकाज करणे असुरक्षित झाले आहे. तरी याचा तातडीने बंदोबस्त करावा व त्याचेवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली. याबाबत मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी पांचगणी पोलीस ठाण्यात अनमोल कांबळे याचेविरोधात शासकीय कामांमध्ये अडथळा आणून हल्ला केलेबाबत गुन्हा दाखल केला. पांचगणी पोलिसांचे पथक अनमोल कांबळे याच्या शोधासाठी रवाना झाले आहेत. या घटनेचा अधिक तपास पांचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पांचगणी पोलीस करीत आहेत.

दरम्यान, या घटनेची माहिती समजताच महाबळेश्वरच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील, वाईचे मुख्याधिकारी किरण मोरे यांचेबरोबरच पांचगणी शहर व परिसरातील व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक हे पोलीस ठाण्यात दाखल झाले. या घटनेचा जाहीर निषेध करीत मुख्याधिकारी यांना दिलासा दिला.