Shalinitai Patil Death : शालिनीताई पाटील यांचे निधन; मुंबईत घेतला अखेरचा श्वास

Shalinitai Patil Death
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Shalinitai Patil Death । माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आणि राज्याच्या माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचं आज दुःखद निधन झालं आहे. वयाच्या ९४ व्या वर्षी मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पहिल्यांदा आवाज उठवणाऱ्या नेत्या म्हणून शालिनीताईंना ओळखले जात होते. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एकेकाळी काॅग्रेस ची महाराष्ट्राची धूरा ताईंवर सोपवली होती स्व.यशवंतराव चव्हाणही ताईंना आदराने मान द्यायचे. शालिनी पाटील यांच्या पार्थिवावर साताऱ्यातील कोरेगावात अंत्यसंस्कार होणार आहेत. शालिनी पाटील यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

आक्रमक अशी ओळख- Shalinitai Patil Death

शालिनीताई या वसंतदादाच्या दुसऱ्या पत्नी होत्या. त्यांनी वसंतदादांना खबीर साथ दिली होती. त्या मागील काही दिवसापासुन आजारी होत्या. वसंतदादा पाटील यांच्या पत्नी असल्या तरी त्यांनी शालिनीताईंनी महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःची एक वेगळी आणि आक्रमक अशी ओळख निर्माण केली होती. शालिनीताई पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते, तसेच कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून 1999 ते 2009 या काळात त्या आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यापूर्वी 1980 च्या दशकात त्यांनी काँग्रेस सरकारच्या काळात मंत्रिपद भूषवले होते. त्यावेळी 1981 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते.

शालिनीताई पाटील या त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जायच्या. जे काही मनात आहे, जी काही भूमिका आहे ते तोंडावर बोलून मोकळं व्हायच्या. खास करून त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कायमच आक्रमक भूमिका मांडली होती. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. तसेच महिलांना राजकारणात अधिक प्रतिनिधित्व मिळावे यासाठी सुद्धा त्या आग्रही होत्या. शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी शालिनीताईंचा उल्लेख महाराष्ट्राच्या राजकारणातील वाघीण असा केला होता. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील एक खंबीर नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.