पाचगणी प्रतिनिधी। सादिक सय्यद
अतिवृष्टीमुळे सातारा सातारा जिल्ह्यात शेतीशी जनावरांच्या शेडचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या ठिकाणी केलेल्या पंचनाम्याची माहिती घेण्यासाठी महाबळेश्वर येथे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. यावेळी महाबळेश्वर तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी न जाता कांदाटी खोऱ्यातील १४७ कोंबड्या दगावल्याच्या दिलेल्या माहितीवरून गृहराज्यमंत्री देसाई यांनी अधिकाऱ्यांना धरेवर धरले. “पशुवैद्यकीय अधिकारी तुम्ही जनावरे न मोजता पंचनामा कसा केला? असा सवाल देसाई यांनी केला.
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली महाबळेश्वर येथे नुकतीच प्रशासनाची बैठक घेण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी संगीता राजपुरकर, पोलीस उपविभागीय अधिकारी शितल जानवे, तहसिलदार सुषमा पाटील, महाबळेश्वर मुख्याअधिकारी पल्लवी पाटील, पाचगणी मुख्याअधिकारी गिरीश दापकेकर, सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता गोंजारी, जिल्हा परिषद बांधकाम विभाग अभियत्या आदींसह जिल्ह्यातील जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
महाबळेश्वर तालुक्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर फक्त कागदोपत्री काम न करता अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात जागेवर जाऊन लोकांशी चर्चा करुन अतिवृष्टीच्या नुकसानीची माहिती घ्यावी, अशी सक्त सुचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आढावा बैठकीत केली. यावेळी गृहराज्यमंत्री देसाई यांनी चिखली गावातील वीज वितरणच्या भोंगळ कारभारावरून वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तर यावेळी गृहराज्यमंत्री देसाई यांनी महाबळेश्वर तालुक्यातील रस्ते लवकरात लवकर तात्पुरत्या स्वरूपात सुरक्षितपणे दळणवळणासाठी सुरु करावेत. तसेच धोकादायक रस्त्याची यादी घेऊन संबंधित रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्याची सुचना अधिकाऱ्यांना दिल्या.