सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
गृहराज्यमंत्री व शिवसेनेचे आ. शंभूराज देसाई यांना शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालयाकडून एक नोटीस आलेली आहे. या नोटीसीत आज बुधवारी दि. 22 रोजी होणाऱ्या सायंकाळी मुंबईत वर्षा बंगल्यावरील बैठकीस उपस्थित राहण्यास सांगितले आहे. बैठकीस अनुपस्थित राहिल्यास पक्षातून अपात्रतेची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शिवसेना विधीमंडळ पक्षाचे मुख्य प्रनोत सुनिल प्रभू यांनी पक्षाच्या बैठकीची सूचनेची नोटीस दिली आहे. सदरील नोटीस सातारा येथील कोयना निवास्थानी सातारा शिवसेना जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव हे घेवून गेले होते, तेथे पोलिसांनी नोटीस लावण्यासाठी अटकाव केली आहे. शिवसेना पक्षाची आज संध्याकाळी 5 वा होणाऱ्या बैठकीसाठी उपस्थित राहण्याची नोटीस आहे.
शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या बैठकीच्या नोटीसीत म्हटले आहे की, पार्श्वभूमीवर पक्षांतर घडवून सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याने आणि त्यामुळे राज्यात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता, अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी बुधवार दि. २२ जून २०२२ रोजी वर्षा बंगला, माऊंट प्लेझंट रोड, मुंबई ४००००६ येथे सायंकाळी ०५.०० वाजता तातडीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकांस आपली उपस्थिती आवश्यक आहे याची नोंद घ्यावी.
सदर सूचना आपण महाराष्ट्र विधानसभेत नोंदणी केलेल्या ई-मेल पत्यावर पाठविली आहे. त्या व्यतिरीक्त आपण समाज माध्यमे, व्हॉट्स अॅप आणि एस.एम.एस. द्वारेही कळविली आहेत. या बैठकीस लिखित स्वरुपात वैध आणि पुरेशी कारणे प्रदान केल्याशिवाय आपणास गैरहजर रहाता येणार नाही.
सदरहू बैठकीस आपण उपस्थित न राहिल्यास आपण स्वेच्छेने शिवसेना पक्षाच्या सदस्यत्व सोडण्याचा तुमचा स्पष्ट इरादा आहे, असे मानले जाईल. आणि परिणामी आपणावर भारतीय संविधानातील सदस्यांच्या अपात्रते संदर्भात असलेल्या तरतुदी नुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.