कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यासह सोलापूर आणि अक्कलकोट येथील गावांवर आपला दावा सांगितला आहे. त्यांनतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी एकही इंच जागा आम्ही कर्नाटकाला देणार नाही अशा शब्दात बोम्मई यांना ठणकावलं आहे. ते कराड येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी उच्चस्तरीय उच्चधिकार समिती होती त्याचे पुनर्घठन झालं आहे. त्याची व्याप्ती वाढवली आहे. अनके लोकांचा त्यामध्ये समावेश केला आहे. त्यांनतर एक बैठकही झाली असून चंद्रकांत पाटील आणि स्वतः मी आम्ही दोघे यामध्ये समन्वयक म्हणून काम सुरु केलं आहे. सीमावर्ती भागात ८६५ गावातील नागरिकांना काय सवलती देता येतील, नागरिकांना आपण शैक्षणिक सुविधा देतो, आरोग्याच्या बाबतीत सुविधांची व्याप्ती कशा पद्धतीने वाढवता येईल. या सर्व बाबींवर आमचं काम सुरु झालं आहे.
पूढच्या आठवड्यात चंद्रकांत पाटील आणि मी बेळगावला जाणार आहे. तिथल्या पदाधिकाऱ्यांशी बोलतोय, जनतेशी बोलतोय. महाराष्ट्राशी एक इंचही जागा कर्नाटकला जाणार नाही यासाठी जे जे करावं लागेल ते सर्व आम्ही करतोय अशी माहिती शंभूराज देसाई यांनी दिली .
दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाविषयी सुद्धा शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली. राज्यपाल यांनी केलेले वक्तव्य योग्य नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे कालही आदर्श, आजही आणि पुढे हजारो वर्षे आदर्श असतील. राज्यपालाविषयी काय भुमिका घ्यायची ते वरिष्ठ घेतील. त्यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही असं त्यांनी म्हंटल.