कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
माजी गृहराज्यमंत्री व पाटण विधानसभेचे विद्यमान आमदार शंभूराज देसाई यांना मंत्रीपदाची पुन्हा लाॅटरी लागली आहे. शिवसेनेतून बंडखोरी करण्यात आ. देसाई यांचा मोठा हात होता. त्यामुळे त्याचे मंत्रिपद निश्चित मानले जात होते. त्यानुसार आजच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली असून आता कॅबिनेट दर्जा मिळणार असल्याने देसाई समर्थकांच्यात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण आहे.
आमदार शंभूराज देसाई यांना आता कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असून सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री पदही मिळणार असे, जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यात आ. देसाई यांचा दबदबा पहायला मिळणार आहे. गृहराज्यमंत्री पदावर असताना पोलिस दलात एक डॅंशिंग मंत्री म्हणून त्यांची अोळख निर्माण झाली आहे.
शिवसेनेतून बाहेर पडत शिंदे गटाने भाजपाशी हातमिळवणी केली. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आघाडीवर आ. शंभूराज देसाई होते. सातारा जिल्ह्यातील नव्हेच तर पश्चिम महाराष्ट्रातील एक अभ्यासू, डॅशिंग व अधिकाऱ्यांच्यावर वचक ठेवणारा असा मंत्री म्हणून आ. देसाई यांची अोळख निर्माण झाली आहे. आ. देसाई यांनी उघडपणे राष्ट्रवादी काॅंग्रेससोबत पंगा घेतला आहे. तर पाटण विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचाच गट आ. देसाई यांचा विरोधक आहे. तेव्हा आता राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात आ. देसाई यांना मोठे आव्हान दिले जावू शकते.