ताराबाई शिंदे : स्त्री-पुरुष समानतेचा विचार मराठीतून सर्वप्रथम मांडणारी स्त्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्वातंत्र्यदिन विशेष । स्त्रीवादी दृष्टिकोनातून आपल्या संस्कृतीचा तर्कशुद्धपणे वेध घेणारी, स्त्री-पुरुष समानतेचा विचार मराठीतून सर्वप्रथम स्पष्टपणे मांडणारी एकोणिसाव्या शतकातील विचारवंत स्त्री म्हणून ताराबाई शिंदे परिचित आहेत. विधवांच्या प्रश्नांविषयी, पुनर्विवाहाविषयी आणि एकूणच त्या काळातल्या स्त्रियांच्या प्रश्नांविषयी त्यांनी अतिशय कणखर भाषेत मांडलेले विचार ‘स्त्री-पुरुष तुलना’ या ग्रंथातून १८८२ साली प्रसिद्ध झाले. काळाच्या बरंच पुढे जाऊन केलेलं, पुरुषी मानसिकतेवर घाव घालणारं त्यांचं हे लेखन त्या काळात प्रचंड खळबळ माजवणारं ठरलं. स्त्रीशिक्षणाचा फारसा प्रसार न झालेल्या त्या काळात ताराबाई शिंदे यांच्यासारख्या मराठा समाजातील एका स्त्रीने समाजाच्या ज्वलंत प्रश्नासंबंधी इतक्या परखडपणे आपले विचार या ग्रंथातून मांडावेत, ही अपवादभूतच कृती होती.

ताराबाई शिंदे यांचा जन्म वऱ्हाड (विदर्भ) प्रांतातील बुलठाणी (बुलढाणा) येथे एका सधन कुटुंबात झाला. त्यांचे वडील बापूजी हरी शिंदे हे श्रीमंत जमीनदार होते, तसेच ते डेप्युटी कमिशनरच्या कार्यालयात हेडक्लार्कची नोकरीही करत होते. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या ‘सत्यशोधक समाजा’चेही ते कार्यकर्ते होते. त्यामुळे या चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांची त्यांच्या घरी ऊठबस असायची. बापूजी शिंदे यांना ताराबाई ही एकुलती एक कन्या आणि चार पुत्र होते. जन्मजात बुद्धिमान असलेल्या ताराबाई वडिलांच्या खूप लाडक्या होत्या. त्या काळाचा विचार करता ताराबाईंना त्यांच्या वडिलांनी चांगल्यापैकी शिक्षण दिल्याची नोंद आहे, पण त्यांचं नक्की शिक्षण कितपत झालं याची माहिती उपलब्ध नाही. ताराबाईंना मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत या भाषांचं उत्तम ज्ञान होतं. त्यांचं वाचन चौफेर होतं. त्या काळातली महत्त्वाची मराठी, इंग्रजी वृत्तपत्रं त्या नियमितपणे वाचत असत. महाकाव्यं, संस्कृत नाटकं, धर्मग्रंथ, काव्यग्रंथ यांचंही त्या भरपूर वाचन करीत. या वैविध्यपूर्ण वाचनामुळे त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावत गेल्या, प्रगल्भ होत गेल्या.

ताराबाईंना लग्न करायची फारशी इच्छा नव्हती, परंतु त्या काळच्या चालीरीतींना अनुसरून त्यांच्या वडिलांनी त्यांचं लग्न ठरवून त्यांना घरजावई आणला. पण थोड्याशा अनिच्छेनेच केलेल्या या विवाहामुळे ताराबाईंना संसारसुख काही मिळालं नाही. त्यांना मूलही झालं नाही. त्यातच त्यांचं घराणं खानदानी असल्यामुळे त्यांच्याकडे गोषापध्दती होती. ती मात्र त्यांनी जुमानली नाही. कारण मुळातून त्या करारी, धाडसी आणि निर्भीड स्वभावाच्या होत्या. गावात आणि परिसरात त्यांचा दरारा होता. कोर्टकचेरीच्या कामासाठी त्या घोड्यावर बसून जात असत. शेतीचीही देखभाल त्या करीत. उत्तरायुष्यात त्यांना वैधव्य प्राप्त झालं; पण त्या काळातल्या प्रथेप्रमाणे ‘सांदीचं खापर’ होऊन जगण्याचं त्यांनी नाकारलं. अशा त्यांच्या धाडसी कृत्यांना त्यांच्या वडिलांनीही पाठिंबा दिला.

दरम्यानच्या काळात सुरत येथील विजयालक्ष्मी नामक ब्राह्मण विधवेने व्यभिचार करून गर्भपात केला म्हणून सुरत न्यायालयाने या विधवेला फाशीची शिक्षा सुनावली होती. तिने मुंबई न्यायालात अपील केल्यानंतर ही शिक्षा पाच वर्षांच्या सक्तमजुरीत बदलण्यात आली. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ वृत्तपत्राच्या २६ मे १८८१ रोजीच्या अंकातील ही बातमी आणि त्यानंतर ‘पुणेवैभव’सारख्या सनातनी वृत्तपत्रांनी स्त्रीजातीविरुद्ध उठवलेली टीकेची झोड या गोष्टी ताराबाईंना ‘स्त्री-पुरुष तुलना’ अथवा ‘स्त्री आणि पुरुष यांत साहसी कोण’ हे स्पष्ट करून दाखवणारा निबंध लिहिण्यासाठी निमित्त ठरल्या.

नोव्हेंबर-डिसेंबर १८८१ मध्ये त्यांनी लेखनाला सुरुवात केली, आणि पुढे १८८२ मध्ये पुण्यातील शिवाजी छापखान्यात छापून हा बावन्न पानी निबंध पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला. हे पुस्तक प्रकशित होताच तत्कालीन समाजात एकच खळबळ उडाली. भारतीयच नव्हे तर जागतिक पातळीवर स्त्रियांच्या व्यथा-वेदनांना प्रथमच वाचा फोडणाऱ्या या ग्रंथावर त्या काळातल्या कर्मठ विचारांच्या लोकांनी टीकेची प्रचंड झोड उठवली; पण थोर समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले यांनी १८८५ मध्ये ‘सत्सार’च्या दुसऱ्या अंकात या ग्रंथावर विस्तृत लेख लिहून ताराबाईंच्या विचारांचं जाहीर समर्थन केलं.

वरील विधवेची शोकांतिका ताराबाईंना हा ग्रंथ लिहिण्यासाठी निमित्त ठरली असली, तरी या निमित्ताने एकूण स्त्रीजातीवर घेतल्या जाणाऱ्या अनेक आक्षेपांचं खंडन करण्याच्या व्यापक हेतूनेच त्यांनी लेखणी उचलली, हे त्यांच्या या ग्रंथासाठी त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतून स्पष्ट होतं. त्यात त्या म्हणतात, ”…रोज पुरुषांचे साहस, धाडस व दगाबाजीची नित्य नवी भयंकर उदाहरणे दिसून येत असताही तिकडे कोणीच लक्ष न देता स्त्रियांवरच सर्व दोषांची गोणी लादतात, हे पाहून स्त्रीजात्याभिमानाने माझे मन अगदी खळबळून, तळतळून गेले. त्यामुळे मला निर्भीड होऊन असेच खडखडीत लिहिल्यावाचून राहवेना.”

कोण्या एखाद्या स्त्रीच्या हातून एखादा प्रमाद घडला की तिच्यावर अनेक कुत्सित आक्षेप घेण्याच्या व बायका या जात्याच घातकी आणि निसर्गत:च अनैतिकतेकडे कल असणाऱ्या असतात, असे ताशेरे झोडणारी त्या काळच्या समाजव्यवस्थेतील पूर्वापार चालत आलेली वृत्तीच कर्मठ वृत्तपत्रांतील टीकेच्या रूपाने प्रकट झाली होती. या निबंधात ताराबाईंनी या वृत्तीचा परखड शब्दांत समाचार घेतला. स्त्रियांना दिले जाणारे सारे दोष स्त्रियांपेक्षा पुरुषांतच कसे जास्त आहेत आणि काही स्त्रियांत असे दोष आढळले तरी ते पक्षपाती शास्त्रनिर्बंधांमुळे, निर्दयी रूढींमुळे आणि प्रचलित पुरुषसत्ताक व्यवस्थेमुळेच कसे निर्माण झाले आहेत हे त्यांनी या ग्रंथात स्त्री आणि पुरुष यांची पदोपदी तुलना करून सप्रमाण मांडले. बाईचं पाऊल वाकडं पडतं याला पुरूषच बहुधा जबाबदार असतात, असा युक्तिवाद करताना त्या म्हणतात, ”टाळी एका हाताने वाजत नाही, पण त्यातून उजवे हाताचा जोर जास्त असतो.”

पुनर्विवाहाविषयी त्यांनी म्हटलंय, ”पुनर्विवाह न करण्याची चाल महारोगाप्रमाणे अनेक ठिकाणी व जातींत पसरली आहे. त्यामुळे किती लाखो व कोट्यवधी स्त्रिया वैधव्याचे असह्य दु:ख कसकसे भोगीत असतील व भोगतील व त्यापासून कसकसे अनर्थ होत आहेत व होत असतील याची कल्पनासुद्धा करिता येत नाही.”

वैधव्य आलेल्या स्त्रीचं दु:ख मांडताना त्या पुढे म्हणतात, ”वैधव्याचे गाठोडे पदरात बांधून आपल्या भर्त्याचे गुण-अवगुण वाणीत व सर्व घरच्या-दारच्यांचा जाच काढीत मरून जातात.” पुनर्विवाहबंदीमुळे तरुण विधवांचे पाऊल वाकडे पडून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात भृणहत्या घडताहेत. एकट्या पुणे जिल्ह्यात पाच वर्षांत किमान एक हजार भृणहत्या होत असाव्यात असा अंदाज त्या काळात लोकहितवादींनी सरकारकडे पाठवलेल्या एका पत्रात व्यक्त केला होता. ताराबाई शिंदे यांनी व्यक्त केलेल्या भीतीला लोकहितवादींच्या या पत्रामुळे बळकटीच मिळते.
पुनर्विवाहबंदी तर्काला आणि वास्तवाला धरून कशी नाही हे स्पष्ट करताना त्या विचारतात, ”अरे, नवऱ्याआधी बायकोने मरावे किंवा नवऱ्याने बायकोआधी मरावे याचा तुमच्या बापजाद्यांनी देवांपासून काही दाखला आणला काय रे? मरणे किंवा जगणे हे तर त्या सर्व शक्तिमान नारायणाचे हाती.’

‘एकदा सौभाग्य गेले म्हणजे स्त्रियांनी आपली तोंडे अगदी एखाद्या महान खुण्यापेक्षाही महाजबर अपराध्याप्रमाणे काळी करून सर्व आयुष्यभर आंधारकोठडीत राहावे?’ हे त्यांना मान्यच नव्हते. पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेत अस्तित्वहीन झालेल्या स्त्रीला जगणं कसं अवघड होऊन बसलंय याविषयी त्यांनी अनेक मुद्दे या ग्रंथात मांडले आहेत. ही परिस्थिती बदलण्याची वेळ आली आहे असे सांगून न थांबता इंग्रज सरकारने विधवा पुनर्विवाहाचा कायदा करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

स्त्रीविषयी असलेल्या जातिवंत पोटतिडकीतूनच त्यांनी हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथातून ताराबाई शिंदे यांची बहुश्रुतता, समतोल विचार आणि शास्त्रीय दृष्टिकोन प्रकर्षाने समोर येतात. या ग्रंथात पोथ्या-पुराणांतील अनेक दाखले त्यांनी खऱ्याखोट्याची पारख करून, चिकित्सा करून दिले आहेत. यावरून ताराबाईंच्या चौफेर आणि चौरस वाचनाचा प्रत्यय येतो. त्या काळातल्या लोकप्रिय कथा-कादंबऱ्याही त्यांनी डोळसपणे वाचल्या होत्या. त्यातील पुरुषी मानसिकतेतून लिहिल्या गेलेल्या ‘काही पुस्तकांत आलेल्या स्त्रियांच्या कामविव्हल प्रतिमाचित्रणावर त्यांनी आक्रमक हल्ले चढवले. त्यातील वर्णनं काल्पनिक, अवास्तव आणि स्त्रियांची बदनामी करणारी आहेत, असं परखड मत त्यांनी आपल्या लिखाणातून मांडलं.

‘स्त्री-पुरुष तुलना’ या ग्रंथात ताराबाई शिंदे यांनी वापरलेली भाषा आक्रमक आणि परखड असली तरी स्त्रीस्वातंत्र्याचा किंवा स्त्री-पुरुष समानतेचा अनिर्बंध पुरस्कार त्यांनी केलेला नाही. त्याचप्रमाणे पुरुषांना एकांगी दोषही दिलेला नाही.

या ग्रंथाची शैली अतिशय ओघवती आहे. या लिखाणाला परिणामकारकता आली आहे ती त्यांच्या जीवनानुभवाच्या परिघातीलच उपमानसृष्टीमुळे आणि त्या काळात स्त्रियांच्या तोंडी प्रसिद्ध असलेल्या अनेक लयदार म्हणी आणि वाक्प्रचार यांचा वापर केल्यामुळे. ‘स्त्री-पुरुष तुलना’ या मौलिक ग्रंथामुळे मराठीतील आद्य स्त्री लेखिका होण्याचा बहुमान मिळवलेल्या, लेखनाचे सुप्त गुण असलेल्या ताराबाई शिंदे यांनी नंतरच्या काळात काहीच लेखन कसं केलं नाही, हा प्रश्न मात्र अनाकलनीय आहे.

– महेंद्र मुंजाळ