सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
राज्याचे मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली दिल्लीत सुरू आहेत असा दावा शिवसेना संजय राऊत यांनी केल्यांनतर राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आमची युती भक्कम आहे. दिल्लीतील भाजपचे नेते एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी खंभीरपणे उभे आहेत, त्यामुळे तुम्ही त्याची चिंता करू नका. तुम्ही आधी तुमच्या महाविकास आघाडीचं बघा असा पलटवार शंभूराज देसाई यांनी संजय राऊतांवर केला.
प्रसामाध्यमांशी बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, संजय राऊत काय अंतर्यामी आहेत का? दिल्लीत भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये काय चाललंय ते त्यांना इथं बसून कळत का??असा सवाल शंभूराज देसाई यांनी केला. स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून अशी त्यांची अवस्था झाली आहे. आमच्या घरातलं आम्ही बघू, तुम्हांला कोण विचारायला आलं आहे का? मध्ये मध्ये नाक खुपसण्याची संजय राऊत यांना सवय आहे. आम्ही त्यांना महत्त्व देत नाही असं शंभूराज देसाई यांनी म्हंटल.
ते पुढे म्हणाले, 2 वेळा आम्ही विधानसभेत 170 चे बहुमत सिद्ध करून दाखवले आहे. जर तुम्हाला अजून आमचं बहुमत बघायचं असेल तर 180- 185 चे बहुमत दाखवून देऊ. आम्ही सर्व मित्रपक्ष एकत्र असून आमची युती भक्कम आहे. 2024 च्या निवडणूका सुद्धा आम्ही शिंदे- फडणवीसांच्या नेतृत्वाखाली लढणार आहे. तुम्ही आमची चिंता करू नका, दिल्लीतील भाजपचे सर्वोच्च नेत्यांचा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा आहे अस म्हणत शंभूराज देसाई यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केला.