हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मॉल मध्ये वाईन विक्रीचा तत्कालीन महाविकास आघाडीचा निर्णय भाजप आणि अन्य धार्मिक संघटनांच्या विरोधानंतर मागे घेण्यात आला होता. मात्र राज्यात नव्याने स्थापन झालेलया सरकारकडून मात्र पुन्हा एकदा मॉलमध्ये वाईनविक्री सुरू करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. मॉलमधील वाईन विक्री ही राज्याच्या आणि शेतकऱ्याचा हिताची आहे, अशी मत उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केलं आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
शंभूराज देसाई म्हणाले, मॉलमध्ये वाईन विक्रीचं धोरणासंदर्भात सामान्य लोकांकडून मतं जाणून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. जूलैच्या अखेरीस अनेक लोकांनी काही सूचना केल्या आहेत. याप्रकरणी जनता नेमकी किती टक्के समर्थनात आहे आणि किती टक्के विरोधात आहे याचा अंदाज काहीच दिवसात विभागाला येईल. त्यानंतर आम्ही स्वत: या विषयाचा संपूर्ण अभ्यास करणार आहोत. यासंदर्भात मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चाही करणार आहे. सगळ्यांचा आदेश घेऊन हा वाईन विक्रीचा निर्णय घेतला जाईल, असंं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने लॉकडाऊनच्या काळात सुपर मार्केटमध्ये वाईन विकण्या संदर्भात निर्णय घेतला होता. द्राक्ष उत्पादक आणि ज्या फळांपासून वाईन तयार करता येते अशा शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं होतं. मात्र या निर्णयाला तेव्हा भाजपने आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस यांनी कडाडून विरोध केला होता. तसेच हे मद्यप्यांचे सरकार आहे अशा शब्दात त्यांनी तेव्हा टीका केली होती. त्याचमुळे आता स्वतःच्याच सरकारमध्ये फडणवीस मॉल मध्ये वाईन विक्रीला परवानगी देणार का ?? हे आता पाहावं लागेल.