सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कट्टर शिवसैनिक माजी आमदार तात्या पाटील यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज जळगाव दौऱ्यावर आहेत. पाचोरा येथे त्यांची जाहीर सभाही होणार असून उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य असेल. तत्पूर्वी शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी ठाकरेंना थेट इशारा दिला आहे. उद्धव ठाकरेंनी फक्त कार्यक्रमाबद्दल बोलावं अन्यथा ॲक्शनला रिएक्शन येणारच असं त्यांनी म्हंटल आहे.
सातारा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, जळगाव जिल्ह्यात आमचे गुलाबराव पाटील, किशोर पाटील, चिमणआबा, चंद्रकांत पाटील हे सगळे आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचे कार्यकर्त्ये आहोत. कोणाला सभा घ्यावी, काय कराव हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण उद्धव ठाकरे हे माजी आमदार तात्या पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमासाठी येत आहेत. तात्या पाटील यांच्या परिवाराचे ठाकरे कुटुंबाशी जसे चांगले संबंध होते तसेच ते आमच्याशी सुद्धा होते. त्यामुळे अशा पुतळा अनावरणाच्या भावनात्मक कार्यक्रमाला कोणी राजकीय वळण लावायचा प्रयत्न केला आणि आमच्या आमदारांवर टीका करण्याचा प्रयत्न केला तर एकनाथ शिंदेंवर प्रेम करणारे आमचे कार्यकर्ते सहन करणार नाहीत. त्यामुळे त्यांनी फक्त कार्यक्रमाबाबत बोलावं, आमचे नेते ते मान्य करतील. परंतु राजकीय वळणं देण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच ॲक्शनला रिएक्शन येणारच असा थेट इशारा शंभूराज देसाई यांनी दिला.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/701971895267454/?extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&mibextid=l2pjGR
दरम्यान, आज सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास सावा मैदानावर उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. छत्रपती संभाजीनगर, खेड, मालेगाव नंतर आता पाचोरा येथे त्यांची जाहीर सभा होत आहे. जळगावातील अनेक नेते ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात गेल्यांनतर उद्धव ठाकरे प्रथमच जळगावात जाहीर सभा घेत आहेत. त्यामुळे आजच्या सभेत ते काय बोलणार? बंडखोरांचा समाचार कोणत्या शब्दांत घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य लागलं आहे.