सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
किल्ले प्रतापगड येथे दरवर्षी 30 नोव्हेंबर रोजी शिवप्रताप दिन साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी शिवप्रताप दिन अधिक उत्साहात साजरा करता यावा यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे.
शिवप्रताप दिनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री देसाई यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या. शिवप्रताप दिनानिमित्ताने प्रतापगड येथे आयोजित करावयाच्या कार्यक्रमाविषयी उद्या आढावा बैठक बोलावण्यात आली आहे.
यंदाचा शिवप्रताप दिन विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा वध केला ती तिथी शिवप्रताप दिन म्हणून साजरी केली जाते. या दिवशी गडावर भवानी मातेची पूजा, पालखी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यावर पुष्षवृष्टी तसेच मर्दानी खेळांचे आयोजन केले जाते. यंदा या उपक्रमांमध्ये आणखी विविध उपक्रम राबविण्याविषयी जिल्हा प्रशासनाने नियोजन करावे व हा दिन मोठया उत्साहात साजरा व्हावा, अशा सूचनाही पालकमंत्री देसाई यांनी दिल्या आहेत.