रायगडावर तुतारीचे नाद घुमले!! अखेर शरद पवार गटाच्या नव्या चिन्हाचे झाले अनावरण

Sharad Pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी पक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) गटाचा असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले. त्यानंतर आयोगाने शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या पक्षाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ असे नवे नाव दिले. त्यानंतर काही दिवसांमध्येच आयोगाने शरद पवारांच्या नव्या पक्षाला ‘तुतारी फुंकणारा माणूस’ असे चिन्ह दिले. आज याच चिन्हाचे रायगडावर अनावरण करण्यात आले आहे. स्वतः शरद पवार यांनी रायगडावर जाऊन पक्षाच्या नव्या चिन्हाचे अनावरण केले आहे. यावेळी रायगडावर पक्षातील सर्व वरिष्ठ नेते आणि इतर मंडळी, कार्यकर्ते उपस्थित होते.

नव्या चिन्हाचे अनावरण

राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीच्याच नावावरून आणि चिन्हावरून अजित पवार गट आणि शरद पवार गटांमध्ये नवा वाद निर्माण झाला होता. हा वाद शेवटी निवडणूक आयोगाच्या दारात पोहोचला. बऱ्याच दिवसांपासून आयोगापुढे या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. अखेर गेल्या दोन आठवड्यांपूर्वीच आयोगाने या प्रकरणाचा निकाल अजित पवार गटाच्या बाजूने दिला. तसेच शरद पवार यांच्या गटाने आम्हाला पक्षासाठी तीन नावांचे आणि चिन्हांचे पर्याय द्यावे असे आदेश आयोगाने दिले होते. त्यानुसार शरद पवार गटाकडून देण्यात आलेल्या नावांमधून आयोगाने ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ हे नाव निवडून काढले. यानंतर आयोगाकडून बुधवारी शरद पवार गटाला तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह देण्यात आले.

खरे तर, यापूर्वी शरद पवार गटाने पक्षाचे नवे चिन्ह म्हणून वटवृक्षाची मागणी केली होती. परंतु आयोगाकडून शरद पवार गटाला हे चिन्ह देण्यात आले नाही. याउलट तुतारी फुंकणारा माणूस असे नवे चिन्ह आयोगाने जाहीर केले. आता याच नवीन चिन्हाला आणि पक्षाच्या नवीन नावाला घेऊन शरद पवार आगामी निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहेत. मुख्य म्हणजे, आयोगाकडून चिन्ह मिळाल्यानंतर आज शरद पवार यांच्या हस्ते रायगडावर या चिन्हाचे अनावरण देखील करण्यात आले आहे.

दरम्यान, रायगड किल्ला चढण्यासाठी खूप अवघड आहे. यामुळे शरद पवार रोप वे च्या माध्यमातून रायगड किल्ल्यावर पोहचले आहेत. त्यानंतर पालखीच्या माध्यमातून त्यांना कार्यक्रमस्थळी नेण्यात आले. आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कमीत कमी वेळेत तुतारी चे चिन्ह मतदारांपर्यंत पोचवण्याचे काम शरद पवार गटाला करावं लागणार आहे.