हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवारांचं बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २ गट पडले असून अनेक बडे नेते अजितदादांसोबत राहिलेत, मात्र मागील काही दिवसांपासून दादा गटातील आमदार पुन्हा एकदा शरद पवारांकडे (Sharad Pawar) परतणार असल्याच्या जोरदार चर्चा महाराष्टरच्या राजकारणात सुरु आहेत. अजून तरी दादा गटातील कोणताही आमदार अधिकृतपणे शरद पवारांच्या गटात गेलेला नाही. मात्र राष्ट्रवादीच्या सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingane) यांच्या एका विधानाने दादा गटात खळबळ उडण्याची शक्यता आहे. आजही शरद पवार साहेब माझे नेते आहेत, ते मला नेहमीच आदरणीय आहेत मात्र नाईलाजाने मी अजित पवारांसोबत गेलो अशी स्पष्ट कबुलीच राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.
वर्ध्यात माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या ७५व्या वाढदिवसाच्या निमित्तानं एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार गटाचे आमदार राजेंद्र शिंगणे हे एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमात बोलताना राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवार यांचे कौतुक करत आभार मानले आहेत. गेली अनेक वर्षे मी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. माझ्या राजकीय जडणघडणीमध्ये देखील शरद पवार यांचा मोठा मोलाचा वाटा असल्याचंही मी मान्य करतो. त्यामुळे मी आयुष्यभर निश्चितपणे त्यांचा ऋणी राहणार आहे. मात्र, मध्यंतरीच्या काळात आमच्या जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे मी नाईलाजाने अजित पवार यांच्याबरोबर गेलो. त्यानंतर आज राज्य सरकारने जिल्हा सहकारी बँकेला ३०० कोटी रुपये दिले. परंतु निश्चितपणे शरद पवार माझ्यासाठी आदरणीय राहतील असं शिंगणे यांनी म्हंटल.
राजेंद्र शिंगणे पुढे म्हणाले, मी पवारांचं नेतृत्व मान्य करतो. खर म्हटलं तर आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मी अनेक वर्ष काम करत आलो आहे. जवळपास तीस वर्ष झाले आहे त्यांच्या नेतृत्वात काम करत आहे. माझ्या राजकीय जडणघडणी मध्ये शरद पवार यांचा मोठा वाटा आहे, याबाबत मी आयुष्यभर ऋणी आहे. शरद पवार साहेबांचं नेतृत्व राज्याला आणि देशाला आश्वासक राहणार आहे असेही राजेंद्र शिंगणे यांनी म्हंटल आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजेंद्र शिंगणे अजित पवारांची साथ सोडून पुन्हा एकदा शरद पवारांच्या गटात जाणार का? या चर्चाना जोर आला आहे. दादा गटाला हा मोठा धक्का ठरेल.