हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मंगळवारी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षासंदर्भात एक मोठा निर्णय दिला आहे. यावेळी, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचे आयोगाने जाहीर केले आहे. त्यामुळे या निर्णयाचा शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. या निकालात निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह दोन्ही अजित पवार गटाला दिले आहे. त्यामुळे आज दुपारपर्यंत शरद पवार (Sharad Pawar) यांना पुन्हा नव्याने पक्षाचे नाव आणि चिन्ह निवडणूक आयोगाला द्यावे लागणार आहे.
आयोगाने शरद पवार यांना सूचना दिले आहेत की, ते त्यांच्या पक्षाची स्थापना करण्यासाठी कोणतीही आज चार वाजेपर्यंत चार नावे देऊ शकतात. आयोगाने दिलेल्या या सूचना नंतर शरद पवार गटात पक्षाचे नाव आणि चिन्ह ठरवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. अशातच शरद पवार गटाकडून पक्षासाठी काही नावे आणि चिन्ह निश्चित करण्यात आल्याचे समोर आले आहे.
नाव आणि चिन्ह
मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार निवडणूक आयोगाला, शरद पवार काँग्रेस, मी राष्ट्रवादी आणि शरद स्वाभिमानी पक्ष, अशी पक्षासाठी नावे देणार आहेत. तर कपबशी, सूर्यफूल, चष्मा आणि उगवता सूर्य अशी चिन्हे देणार आहे. यातील एक चिन्ह आणि एक नाव आयोगाकडून ठरवण्यात येईल. त्यानंतर या चिन्हावर आणि नावावर शरद पवार पुढील निवडणुका लढतील. मात्र या सगळ्यात आयोगाकडून कोणते नाव ठरवण्यात येईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाजूने निकाल दिल्यामुळे अजित पवार यांच्या गटात आनंदाचे वातावरण पसरले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी नेमकी कोणाची यावरून दोन्ही गटात वाद सुरू होता. शेवटी हा वाद निवडणूक आयोगाच्या दारात पोहोचला. आता निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला सुपूर्द केले आहे. मात्र दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोगाने पक्षपात करून निकाल दिला असल्याचा आरोप शरद पवार गटाने लावला आहे.