खिशात 70 रुपये असताना 100 रुपये खर्च कसे करणार? अर्थसंकल्पावरून पवारांचा सरकारला सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र सरकारने काल 28 जून रोजी विधानभवनात आपला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सरकार कडून अनेक मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या असून जनतेला खुश केलय. येत्या ३-४ महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांना डोळ्यांसमोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. मात्र, विरोधकांच्या या टीकेला अजित पवारांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ‘मी काही नवखा नाही’, असं म्हणत प्रत्युत्तर दिलं. आता यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सरकारवर निशाणा साधलाय. खिशात ७० रुपये असताना १०० रुपये खर्च कसे करणार? असा सवाल पवारांनी राज्य सरकारला केला आहे.

शरद पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकार परिषदेत अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी शिंदे सरकारने अर्थसंकल्पात केलेल्या मोठमोठ्या घोषनांबद्दल विचारलं असता, विधानसभेची निवडणूक लक्षात घेऊन हा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. ज्या गोष्टी प्रत्यक्षात येणार नाहीत अशा गोष्टी अर्थसंकल्पात आहेत, असे शरद पवार म्हणाले. विशेष म्हणजे खिशात 70 रुपये असताना 100 रुपये खर्च कसे करणार? असा खोचक सवालही शरद पवार यांनी केला. खरं तर हा हा अर्थसंकल्प फुटला आहे. काल अर्थसंकल्प मांडण्यात आला. पण त्याच्या आदल्या दिवशीच्या वर्तमानपत्रांत अर्थसंकल्पात काय काय येणार आहे, ते छापून आलं होते असं पवार म्हणाले.

शरद पवार पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आम्ही 48 पैकी 31 जागा जिंकल्या. त्यामुळे राज्य सरकारने आमचा धसका घेतला आहे. मोदींनी राज्यात 18 सभा घेतल्या. पण सभा घेतलेल्या 14 ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला. मोदीच्या कामावर जनता खुश नाही, लोकसभेला जसा निकाल लागला त्याचप्रमाणे विधानसभेचं चित्र असेल असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.