हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. शरद पवारांना झेड प्लस (Sharad Pawar z+ Security) सुरक्षा देण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर असताना शरद पवारांना हि सुरक्षा देण्यात आली असून त्यांच्या अवतीभोवति आता 55 सशस्त्र सीआरपीएफ जवानांची तुकडी तैनात असेल. मात्र या सुरक्षा वाढीवरून शरद पवारांनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे. माझ्या दौऱ्याची खात्रीलायक माहिती मिळवण्यासाठी हि झेड प्लस देण्यात आली असावी असं शरद पवारांनी म्हंटल आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवारांना त्यांच्या वाढीव सुरक्षेबाबत विचारण्यात आलं, त्यावेळी ते म्हणाले याबाबत मला काही माहिती नाही, गृहखात्याचे अधिकारी माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की 3 लोकांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ती तीन लोकं म्हणजे मी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह. आता मला सुरक्षा कशासाठी दिली ते माहीत नाही. पण निवडणुका डोळ्यासमोर आहेत, म्हणून सुरक्षा दिली असावी. माझ्या दौऱ्याची ऑथेन्टिक माहिती मिळवण्याची व्यवस्था असू शकते, बाकी मला काही माहिती नाही. अशी शंका शरद पवारांनी उपस्थित केली तसेच यासंदर्भात मी गृहमंत्रालयातील जबाबदार व्यक्तीशी संवाद साधणार आहे, त्यांच्याशी बोलून माहिती मिळाली की पुढे काय निर्णय घ्यायचा, काय करायचं ते ठरवणार आहे असंही शरद पवारांनी म्हंटल.
राणेंची पवारांवर टीका –
दरम्यान, शरद पवारांना केंद्र सरकार कडून झेड प्लस सुरक्षा देण्यात आल्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत निलेश राणे म्हणाले, शरद पवारांना झेड प्लस सिक्युरिटी मिळाली आहे, ५५ CRPF त्यांना संरक्षण देणार. मला कळत नाही त्यांना कोण मारणार आणि कोणापासून त्यांना धोका आहे?? बातमी वाचली आणि वाटलं की 50 वर्ष फक्त देशात आणि राज्यात कळ काढत बसलं तरी कुणालाही झेड प्लस संरक्षण मिळतं की काय?? असा टोला निलेश राणे यांनी लगावला होता.