हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election) महाविकास आघाडीकडून उभे असलेले शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला. एकीकडे ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर निवडून आले तर दुसरीकडे जयंत पाटील (SKP Jayant Patil) कसे काय पडले? मविआमधून दगाफटका झाला का? यावरुन बरेच तर्क-वितर्क अजूनही सुरु आहेत. याच दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी जयंत पाटील यांच्या पराभवाचे कारण सांगितलं. आमच्यात कुणी कुणाला फसवलं नाही. फक्त स्ट्रॅटेजीमुळे जयंत पाटील यांचा पराभव झाला असं शरद पवारांनी सांगितलं.
शरद पवार आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी विधान परिषदेत महाविकास आघाडीची स्ट्रॅटेजी कशी फसली ते सांगितलं. माझ्याकडे १२ मतं होती. शेकापच्या उमदवाराला पाठिंबा द्यावा असं आम्हाला वाटत होतं. कारण, लोकसभा निवडणुकीत सीपीआय, सीपीएम, शेकाप आमच्या सोबत होते . त्यांनी काही जागा मागितल्या होत्या, पण ते आम्ही देण्याच्या स्थितीत नव्हतो. पण विधान परिषद आणि विधानसभेत त्यांना मदत करू असं सर्वांनी मान्य केलं . त्यामुळे जयंत पाटील यांना आम्ही पाठिंबा देण्याचं ठरवलं होतं. काँग्रेसची मते जास्त होती. त्यांनी उमेदवार दिले. शिवसेना ठाकरे गटाकडे सुद्धा थोडीफार मते होती मात्र ती पुरेशी नव्हती तरीही त्यांनी उमेदवार दिला.
काँग्रेसकडे 37, आमच्याकडे 12 आणि शिवसेनेकडे 16 मते होती. काँग्रेसकडे जेवढी मते होती. त्यांनी दोन आणि एक नंबरचं मत कुणालाही देऊ नये असं मत होतं. काँग्रेसने निवडून येण्यासाठी सर्व मते घ्यावी आधी दोन नंबरची मते 50 टक्के मते शेकाप आणि ठाकरे गटाला द्यावी. एक नंबरची मते अधिक होती आणि ही मते सर्व ट्रान्सफर होतील. तेवढी मते दोन नंबरला जातील. दोन नंबरच्यांनी पहिलं मत ठाकरेंना द्यावं. आणि ठाकरेच्या दोन नंबरने पहिलं मत शेकापला द्यायला असं माझं गणित होतं. मात्र हे गणित मान्य झालं नाही. त्यामुळे शेकापचे जयंत पाटील पडले. यामधेय कुणी कुणाला फसवलं नाही. फक्त स्ट्रॅटेजीमुळे पडले” असं उत्तर शरद पवारांनी दिले.