हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० आमदारांनी शरद पवारांची साथ सोडत भाजपसोबत सत्तास्थापन केली, त्यानंतर निवडणूक आयोगाकडून सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह मिळवण्यात त्यांना यश आलं. या एकूण सर्व घडामोडींना आता वर्षभरातून अधिक काळ लोटला आहे. मात्र शरद पवारांनी (Sharad Pawar) या एकूण राजकीय परिस्थितीवर प्रथमच जाहीरपणे भाष्य करत म्हंटल कि, अजित पवार सोडून गेल्याने अस्वस्थता वाटली, पण चिंता करायची नसते. मजबुतीने उभं राहायचं असत. जनतेवर माझा पूर्ण विश्वास आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना शरद पवार म्हणाले, अजित पवारांनी (Ajit Pawar) साथ सोडल्यानं धक्का बसला नाही पण त्यावेळी अस्वस्थता वाटली. अजित पवार एकटेच नाही तर त्यांच्यासोबत विधिमंडळातील 25-30 सभासद गेले. अनेकांच्या निवडणुकीच्या यशासाठी तिथं गेलो असेन, त्यांच्यासाठी भाषणं केली असतील. गेल्या पाच दहा वर्षात त्यांना ग्रुम केलं असेल, अजित पवार त्याच्यातील एक घटक होते असं शरद पवार म्हणाले. हे लोक सोडून जातात, विधिमंडळात ज्यांच्या विरुद्ध ते निवडून आले. ज्या भूमिकेला त्यांनी विरोध केला, तिच भूमिका घेऊन ज्यांच्याविरुद्ध लढले त्यांच्याच दारात बसले त्यामुळं अस्वस्थता वाटते. लोकांना जी कमिटमेंट केलेली आहेत, त्याच्याशी सुसंगत पावलं टाकली जात नाहीत, त्यामुळं अस्वस्थता असते.
शरद पवार पुढे म्हणाले, अस्वस्थता असली तरी त्याची चिंता करायची नसते, शेवटी मजबुतीनं उभं राहायचं असते, हिम्मत दाखवायची असते, लोकांना विश्वास दाखवायचा असतो. लोक आमच्यापेक्षा शहाणे असतात, ते कोणाचं बरोबर आहे कोणाचं चूक आहे याच विचार करून लोक निर्णय घेतात. माझ्या पुस्तकाचं नाव देखील लोक माझे सांगाती आहे, लोकांवर विश्वास दाखवायचा असतो, असं शरद पवार म्हणाले.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेवरून शरद पवारांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. यापूर्वी सुद्धा भाजपची सत्ता होती तेव्हा त्यांना बहिणींचं दु:ख दिसलं नाही. आज आपण रोजचं वर्तमान पत्र बघितलं तर स्त्रीयांवर अत्याचार ही बातमी नित्याचीच झालेली आहे आणि ती क्लेशदायक आहे. खऱ्या अर्थानं बहिणींना सुरक्षेची सन्मानाची गरज आहे. पैसे देऊन टीव्हीवर आणि वर्तमानपत्रात जाहिरात देऊन तुम्ही त्यांच्याबद्दलची आस्था दाखवत नाही, महिलांवरील अत्याचार कमी झालेले नाहीत, असं शरद पवार म्हणाले. तसेच समाजात बहिणींच्या घरात बेकारी, महागाई, स्त्रीयांवरील अत्याचाराचा प्रश्न आहे असेही पवारांनी म्हंटल.