मुंबई । कोरोना संसर्गाची भीती झुगारून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राज्यात विविध भागांत दौरे करत असतानाच पवार यांच्या सुरक्षा ताफ्यातील सहा जणांना करोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नगर येथे माध्यमांशी बोलताना माहिती दिली.
शरद पवार यांची रॅपिड अँटिजेन डीटेक्शन टेस्ट घेण्यात आली असता त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात ही चाचणी करण्यात आल्याचे राजेश टोपे यांनी नमूद केले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरद पवार यांनीही पुढील ४ दिवस कुणालाही न भेटण्याचा निर्णय घेतला आहे. ‘पवार साहेब आवश्यक असेलेली सर्व काळजी घेत आहेत. चिंतेचं कोणतंही कारण नाही’, असे टोपे यांनी सांगितलं.
खबरदारी म्हणून शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानातील संपूर्ण स्टाफची तसेच सुरक्षा ताफ्यातील कर्मचारी-अधिकाऱ्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यात ६ सुरक्षा कर्मचारी वगळता बाकी सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”