हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाचव्या टप्प्यातलं मतदान उरकलं आणि महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 48 जागांचा निकाल मतपेटी मध्ये बंद झाला… कुठल्या जागेवरून कोण निवडून येणार? याचे अंदाज बांधले जात असले तरी 4 तारखेला स्पष्ट निकाल समोर येईल… त्यात शरद पवारांनी महाविकास आघाडीला 30 ते 35 जागा मिळतील असा अंदाज लावत महायुतीच्या छातीत धडकी भरवली होती… पण यातल्या तुतारी नेमक्या किती जागांवर आघाडी घेत गुलाल उधळेल? यावर बोलणं मात्र त्यांनी टाळलं होतं… म्हणूनच महाराष्ट्रातील मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर शरद पवारांच्या तुतारीचे उमेदवार ज्या 10 जागांवर रेसमध्ये होते त्यातल्या किती जागा निवडून येतील? शरद पवारांचं राजकीय भविष्य ठरवणाऱ्या लोकसभेच्या महानिकालात तुतारीचे किती खासदार दिल्लीत जातील? हेच सांगणारा हा विशेष रिपोर्ट…
पहिला मतदारसंघ येतो तो अर्थात बारामतीचा… एकट्या राज्यातच नाही तर पुऱ्या देशाचं लक्ष बारामतीत काय होणार याकडे लागलं होतं. याला कारण होतं पवार विरुद्ध पवार अशी लढत… अजितदादांनी बंड करून बहिण सुप्रियाच्या विरोधात आपली पत्नी सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवत पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार अशा संघर्षाची ठिणगी पाडली… सुप्रियाताईंची पॉलिटिकल व्हॅल्यू, शरद पवारांच्या बाजूने असणारं सहानुभूतीचं वारं आणि अजितदादांच्या विरोधात गेलेली स्थानिक समीकरणे यामुळे ताई तुतारी वाजवणार हे फिक्स होतं… मात्र शेवटच्या काही दिवसात नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यापासून अजितदादांनी प्रचाराचा धुराळा उडवून दिला… यावरून मतदान फिरलं अशी चर्चा होती… पण या अटीतटीच्या लढतीत सुप्रियाताई निसटता विजय मिळवतील असा अंदाज सर्वच राजकीय विश्लेषक व्यक्त करतायत…
दुसरा मतदारसंघ आहे तो साताऱ्याचा…
बारामतीनंतरचा शरद पवारांचा हक्काचा बालेकिल्ला कुठला असेल तर तो साताऱ्याचा… इथे परिस्थिती मात्र बिकट होती. जनमत पवारांच्या बाजूने होतं. पण लोकसभेच्या रिंगणात उतरवावं, असा एकही चेहरा पवारांना सापडत नव्हता. बरीचशी चाचपणी केल्यानंतर अखेर शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला… विरोधात उदयनराजे असले तरी यंदाच्या निवडणुकीत हक्काची मतं वगळता म्हणावी अशी त्यांची क्रेझ नव्हती… त्यामुळे प्रचारापासून ते प्रत्यक्ष मतदानापर्यंत शशिकांत शिंदे नावाची मतदारसंघात चर्चा होती… शरद पवारांच्या प्रत्येक वाईट काळात साथ देणारा हा सातारा यंदाही शिंदेंना लोकसभेवर पाठवेल, असा एकूण अंदाज आहे…
तिसरा मतदार संघ आहे तो माढ्याचा…. माढ्याचा तिढा हा सर्वात जास्त ड्रामॅटिक ठरला… इथंही भाजपकडून रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट रिपीट केल्यानंतरही पवारांना इथून उमेदवार सापडत नव्हता… महादेव जानकरांना पाठिंबा देण्याचा डाव त्यांनी टाकून पाहिला पण त्यात त्यांना यश काही आलं नाही… याच दरम्यान अगदी अनपेक्षितपणे महायुतीत नाराज असलेल्या आणि लोकसभेसाठी इच्छुक असणाऱ्या धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हातात तुतारी देत पवारांनी मोठे राजकारण खेळलं… मोहिते पाटलांनी उडवून दिलेला प्रचाराचा धुराळा आणि शरद पवारांनी घेतलेल्या एकामागून एक सभा यामुळे मोहिते पाटील इथल्या लढतीत प्लसमध्ये राहिले… उत्तमराव जानकर, सुशील कुमार शिंदे यांना सोबत घेत मोहिते पाटलांनी इथलं जातीय समीकरण आपल्या बाजूने वळत करून घेतलं… या सगळ्यांचा परिणाम म्हणून माढ्यात 4 जूनला तुतारीचाच आवाज जास्त येईल, असं स्थानिकांचं म्हणणं आहे…
चौथा मतदारसंघ आहे तो शिरूरचा… घड्याळ विरुद्ध तुतारी अशा या लढतीत अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात चांगली चुरस झाली… असं असलं तरी दिलीप वळसे पाटील, दिलीप मोहिते पाटील आणि स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हणाव असं आढळरावांचं काम केलं नाही अशी चर्चा झाली… शेवटच्या दिवसात अमोल कोल्हे यांनी केलेला वादळी प्रचार आणि त्याला शरद पवारांची मिळालेली जोड यामुळे कोल्हेंच्या तुतारीच पारड शिरूरमध्ये सध्यातरी जड दिसतंय…
पाचवा मतदारसंघ आहे तो दक्षिण नगरचा…
निलेश लंके विरुद्ध सुजय विखे पाटील अशी काट्याने काटा काढावा अशी झालेली रंगतदार लढत… पैसे वाटण्यापासून ते बोगस मतदानापर्यंत अनेक घटना नगरमध्ये घडल्या… प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असं या निवडणुकीला स्वरूप आणत लंकेंनी आधीच स्वतःला सेफ केलं… विखेंना पक्षांतर्गतच सहन करावा लागलेला नाराजीचा फटका, लंकेंवर केलेलं पण विखेंवर बूमरँग झालेलं अजितदादांचं स्टेटमेंट या सगळ्यामुळे लंके नगरमध्ये तुतारी वाजवतील, याची खात्री अनेकांना वाटतेय…
सहावा मतदारसंघ आहे तो बीडचा…
अत्यंत हायव्होल्टेज ठरलेल्या या मतदारसंघात पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग बप्पा सोनवणे यांच्यात घासून लढत झाली… बोगस मतदानाच्या अनेक घटना, निवडणूक नियमांचे केलेलं उल्लंघन आणि अनपेक्षितपणे वाढलेला मतदानाचा आकडा यामुळे इथे काहीतरी शिजतंय, असा संशय घेतला गेला… बजरंग बाप्पांनी तर फेर मतदानाची मागणी केली… मराठा विरुद्ध ओबीसी अशा जातीय ध्रुवीकरणातून झालेल्या या निवडणुकीत बजरंग बाप्पा यांचं पारड शेवटपर्यंत जड दिसलं… त्यामुळे पंकजा मुंडे यांच्यासाठी बालेकिल्ल्यात तुतारी वाजणं ही धोक्याची घंटा ठरू शकते…
राज्यातल्या शेवटच्या म्हणजेच पाचव्या टप्प्यात पार पडलेला पुढचा मतदारसंघ आहे तो भिवंडीचा…
भिवंडीची मुख्य लढत शरद पवार गटाकडून बाळ्यामामा उर्फ सुरेश म्हात्रे विरुद्ध भाजपकडून स्टॅंडिंग खासदार कपिल पाटील यांच्यात मुख्य लढत झाली… पाटलांच्या विरोधात असणारी अँटीइन्कमबन्सी, दोन टर्म निवडून देऊनही तसाच जिवंत असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे जनतेला बदल हवा होता… हेच जनमानस ओळखून पवारांनी इथून बाळ्यामामा यांना मैदानात उतरवलं… भिवंडी मध्ये कागदावर महायुतीची ताकद जास्त दिसत असली तरी ग्राउंडवर मात्र महाविकास आघाडी एकदिलाने काम करत असल्यामुळे तुतारीची हवा होती… मनी आणि मसल पॉवर, सर्वपक्षीय नेत्यांशी असणारे जिव्हाळ्याचे संबंध आणि शरद पवारांच्या बाजूने असणार वारं याचा अचूक अंदाज घेतला, तर बाळ्यामामा भिवंडी गाजवणार, असं इथलं वातावरण आहे…
आता उरले ते तीन उमेदवार… रावेर मधून रक्षा खडसे यांच्या विरोधात पवारांनी राजकारणात अगदीच नवख्या असणाऱ्या श्रीराम पवार यांना उमेदवारी दिली… नाथाभाऊ यांनी पवारांची साथ सोडत पुन्हा एकदा भाजपात प्रवेश केल्यानं जळगाव आणि रावेर मधील राष्ट्रवादीची ताकद कमी झाली होती… श्रीराम पवार यांनी कडवी झुंज दिली असली तरीदेखील रक्षा खडसे यांचं पारड इथं मजबूत आहे…
यासोबतच दिंडोरीमध्ये भाजपमध्ये भारती पवार विरुद्ध शरद पवार गटाकडून भास्कर भगरे यांच्यात लढत झाली… शेतीच्या मुद्द्यापासून कामधंद्यापर्यंत प्रत्येक प्रश्नावर दिंडोरीची जागा लढली गेली… पण महाविकास आघाडीचा म्हणावा असा जोर न लागल्याने आणि भाजपचा बालेकिल्ला असल्याने भारती पवार इथे तुतारीला ओव्हरटेक करतील…
आता पाहूयात शेवटचा मतदारसंघ आणि तो म्हणजे वर्ध्याचा…
विदर्भातल्या शरद पवारांच्या या एकमेव जागेवर भाजपकडून रामदास तडस विरुद्ध तुतारीकडून अमर काळे यांच्यात लढत झाली… भाजपचा हा मागील दोन टर्म पासून अभेद्य बालेकिल्ला असल्यामुळे इथं महायुतीनं चांगला जोर लावला होता… पण रामदास तडस हे तुतारीला वर्ध्यातून वरचढ राहतील, असं एकंदरीत चित्र दिसतंय… तर अशाप्रकारे एकूण दहा जागांपैकी तब्बल सात जागांवर तुतारीचा आवाज घुमू शकतो… हा आकडा खालीवर होऊ शकतो पण पक्ष फुटी नंतरही हा विजय शरद पवारांना राजकारणात जिवंत ठेवणारा… आणि नवीन उभारी घेऊन देणारा ठरू शकतो… महाराष्ट्रात तुतारीचा आवाज किती मतदारसंघात घुमेल? तुमचा अंदाज काय सांगतो? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा…