हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन सुरक्षारक्षकाना कोरोनाची बाधा झाली आहे. परंतु यापैंकी कोणीही शरद पवारांच्या संपर्कात नव्हतं अशीही माहिती समोर येत आहे.
रॅपिड टेस्टमध्ये सिल्व्हर ओकवरील हे दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. आता सिल्व्हर ओकवरील इतर सर्व कर्मचारी आणि शरद पवारांच्या पीएंचीही कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यांचा कोरोना अहवाल येणं बाकी आहे. दरम्यान यामुळे शरद पवार हे पुढील काही दिवस कुणालाही भेटणार नसल्याची शक्यता आहे.
दरम्यान काल शरद पवार हे पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह पुण्याला गेले होते. त्यानंतर रात्री ते पुन्हा मुंबईला आल्याची माहिती आहे.
याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वांद्र्यातील मातोश्री या निवासस्थानाबाहेर गेटवर सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत तीन पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. तसेच रश्मी ठाकरे यांच्या सुरक्षारक्षकाला देखील कोरोना झाल्याचं समोर आलं होतं.